“सरकारला लाज वाटत नाही का?”; एसटी चालकांच्या पगाराच्या मुद्यावरून बच्चू कडू आक्रमक

Bachu Kadu on Dada Bhuse| आमदार बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांनी आज विधानसभेत बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. एसटी चालकाला फक्त १२ हजार रुपये पगार देता. सरकारला याची लाज वाटत नाही का? असा थेट सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
“अध्यक्ष महोदय तुमच्या मागे सत्यमेव लिहले आहे. त्यामुळे दादा भुसे यांनी फक्त सत्य सांगावं. त्यांच्या चालकाला जो पगार मिळतो, तो एसटीच्या चालकाला का मिळत नाही. दादा भुसे यांच्या गाडीचा चालक एसीच्या गाडीतून फिरतो. मात्र, एसटीचा चालक भर उन्हात एसटी चालवतो. जनतेची सेवा करतो. पण त्याला पगार दादा भुसे यांच्या चालकापेक्षा कमी आहे. तुम्ही अन्याय का करत आहात? किमान वेतन कायदा सांगतो की किमान १४ हजाराच्या वर वेतन दिलं पाहिजे,” असे बच्चू कडू यांनी म्हंटले.
“शासनच जर कायदा मोडत असेल, तर थोबाडीत कुणाच्या मारायची? तुम्हाला राग येत नाही का? याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे. एका चालकाला तुम्ही २५ ते ३० हजार पगार देता आणि जो सगळ्यांची सेवा करतो, त्याला तुम्ही १२ हजार पगार देता? याची तुम्हाला लाज वाटत नाही का?,” असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
यावर दादा भुसे म्हणाले की, ” मी बच्चू कडू यांचा आदर करतो. मीही त्यांच्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. दादा भुसे यांनी दर १० वर्षांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती केली जाते. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानुसार पुढे निर्णय घेतला जाईल,” असे यावेळी दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
‘लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका’ ; राजू शेट्टींचा दूध दरावरून थेट सरकारलाच इशारा





