Islamabad Peace Talks : इस्लामाबाद शांतता चर्चा पुन्हा अनिर्णित! इराणचे परराष्ट्र मंत्री चर्चेविना परतले, अमेरिकेने पाकिस्तान दौरा केला रद्द
Islamabad Peace Talks : शनिवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांचीही उपस्थिती होती.

Islamabad Peace Talks : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे एका मोठ्या शिष्टमंडळासह इस्लामाबादमध्ये दाखल झाले होते, मात्र अमेरिकन प्रतिनिधीमंडळाशी कोणतीही भेट न होताच ते तातडीने रवाना झाले आहेत. इराणच्या या भूमिकेनंतर अमेरिकेनेही आपला नियोजित पाकिस्तान दौरा रद्द केला असून, यामुळे होर्मुज सामुद्रधुनीतील संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शनिवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांचीही उपस्थिती होती. या भेटीनंतर शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावरून ही चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले असले तरी, अमेरिकेशी प्रत्यक्ष बोलण्यास इराणने स्पष्ट नकार दिला आहे.
इराणचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनी ठामपणे सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा होणार नाही; इराण केवळ पाकिस्तानच्या माध्यमातून आपले म्हणणे अमेरिकेपर्यंत पोहोचवेल. अमेरिकेच्या आक्रमक धोरणामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोपही इराणने केला आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे इस्लामाबादला जाणार होते, परंतु इराणचे प्रतिनिधी निघून गेल्यामुळे त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, केवळ चर्चेसाठी १८ तासांचा प्रवास करून जाण्यात काहीच अर्थ नाही, जी चर्चा फोनवरही होऊ शकते.
अमेरिकेची स्थिती सध्या मजबूत असून सर्व सूत्रे आमच्या हातात आहेत, असा दावा त्यांनी केला. इराणने चर्चेचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती मिळाल्याचे मान्य करतानाच ट्रम्प यांनी दोन मुख्य अटी ठेवल्या आहेत. यामध्ये इराणने युरेनियमचा साठा नष्ट करणे आणि होर्मुज सामुद्रधुनीतून तेल वाहतूक सुरळीत होऊ देणे या अटींचा समावेश आहे.
पाकिस्तानने या वादात ‘मेसेंजर’ची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम राहिल्याने ही शांतता वार्ता तूर्तास निष्फळ ठरली आहे. इस्लामाबादहून निघाल्यानंतर अराघची आता ओमान आणि रशियाचा दौरा करणार असून, इराण इतर जागतिक शक्तींच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे वॉशिंग्टनमधून या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, मात्र चर्चेची दारे सध्या तरी बंद झाल्याचे चित्र दिसत आहे.




