नवी दिल्ली – बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉनच्या राधाकांत मंदिराची तोडफोड करून लुटमार करण्यात आली आहे. वृत्तानुसार, 200 हून अधिक लोकांनी गुरुवारी ढाकामधील वारी येथील 222 लाल मोहन साहा स्ट्रीट येथील इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर हल्ला केला. या हल्ल्यात सुमंत्र चंद्र श्रवण, निहार हलदर, राजीव भद्र यांच्यासह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मंदिरावर हल्ला झाला. हल्ल्यादरम्यान जमावाने मंदिरात ठेवलेले अनेक मौल्यवान साहित्य लुटून नेले. तसेच हल्लेखोरांनी मंदिराची तोडफोड केली. या हल्ल्यात मंदिराच्या भिंतींना तडे गेले आहेत. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये मंदिरात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचे दिसत आहे. घटनास्थळी अजूनही तणाव आहे. शांतता राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दरम्यान इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी होळीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशातील इस्कॉन मंदिराच्या तोडफोडीचा निषेध केला. तसेच अल्पसंख्यांकांना होत असलेला त्रास पाहून देखील संयुक्त राष्ट्र गप्प बसतं, यावर त्यांनी खेद व्यक्त केला.