Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती
ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्या अपात्रतेला नगरविकास उपसचिवांकडून पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्या अपात्रतेला नगरविकास उपसचिवांकडून पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. अपात्रतेच्या आदेशाविरोधात राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अपील अर्जावर नगर विकास विभागाने महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या शिष्टाईला यश आल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी, सांगली यांनी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४४(१) अन्वये ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अवैध बांधकाम प्रकरणी १० जुलै रोजी अपात्र केले होते. त्यामुळे जयंत पाटील यांना धक्का बसला होता.
अपात्रतेच्या आदेशाविरोधात आनंदराव मलगुंडे व सुनील मलगुंडे यांनी राज्यशासनाकडे अपील अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी आमदार जयंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देत मलगुंडे बंधूंची बाजू मांडली होती.
राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अपील अर्जावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या समक्ष गुरुवार दि. ३० जुलै रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. या सुनावणीकडे ईश्वरपूर शहरासह वाळवा तालुक्यातील राजकीय वर्तुळातून लक्ष लागले होते.
मात्र अपरिहार्य कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे नगरविकास विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अपील अर्जावर पुढील आदेश होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दि. १० जुलै २०२६ रोजीच्या आदेशास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा आनंदराव मलगुंडे व नगरसेवकपदी सुनील मलगुंडे यांची वर्णी लागली आहे.




