‘मी आजही शरद पवार यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठीशी राहणार’, ईडी कारवाईबाबत इश्वरलाल जैन यांची प्रतिक्रिया…

जळगाव – ईडी आणि आयकर विभागाने जळगाव येथील प्रसिद्ध व्यापारी आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर आणि अन्य काही कंपन्यावर छापेमोरी केली होती. यामध्ये ईडीने काही कागदपत्रांसह रोख रक्कम जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाईबाबत ईश्वरलाल जैन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कारवाईनंतर ईश्वरलाल जैन म्हणाले, ही कारवाई राजकीय दबावातून झाली, असे मी म्हणणार नाही. शरद पवारांशी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. मी आजही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठीशी राहणार आहे. ईडीने तपासादरम्यान दागिने, रोकड सील करण्याची जी कारवाई केली ती कायदेशीररित्या चुकीचीच आहे. माझ्या नातवांच्या फर्मचा कुठलाही संबंध नसताना त्यांचीही रोकड तसेच मुद्देमाल सील केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ईश्वरलाल जैन यांनी सांगितले की, मुलाने स्टेट बॅंकेच्या विरोधात केसेस केल्या आहेत. तो त्या केसेस मागे घेत नसल्यामुळे बॅंक तडजोड करायला तयार नाही. त्यामुळेच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे होईल ते कायद्यानुसार होईल, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सीबीआयकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद रद्द व्हावी यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्याच्यावर कामकाज सुद्धा सुरू आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ईडीने बजाविले समन्स
स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणी ईडीने सलग दोन दिवस राजमल लखीचंद ज्वेलर्स व अन्य अस्थापनांची झाडाझडती घेतली. या कारवाईनंतर ईडीने संस्थापक आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनिष जैन यांना समन्स बजाविण्यात आले आहे.





