इस्लामाबाद : काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्दयांवर भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे. ही चर्चा केंव्हाही झाली तरी त्याला पाकिस्तानची तयारी आहे. केवळ काश्मीरच्या मुद्दयावरच नव्हे, तर इतर सर्व विषयांवर चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी आहे, असे दार म्हणाले. पाक संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही तयारी दाखवली. पाक व्याप्त काश्मीर पाकिस्ताने भारताला परत देणे आणि दहशतवादाच्याच मुद्दयांवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चा होऊ शकते, असे भारताने स्पष्ट केले आहे. मात्र ही चर्चा कोणत्याही एका मुद्दयापुरती मर्यादित असू शकत नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट केल्याचे दार यांनी जोर देऊन म्हटले आहे. पाकिस्तानने कोणालाही मध्यस्थी करण्याची विनंती केलेली नाही. मात्र चर्चा तटस्थ ठिकाणी व्हावी, असा प्रस्ताव दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपुर्वी झालेल्या संघर्षादरम्यान भारताबरोबर युद्धबंदी करावी, यासाठी आपल्याला अमेरिकेतून फोन आला होता. पाकिस्तानला युदिध नको आहे, हे आपण स्पष्ट केल्याचेही दार यांनी सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ पाकिस्तानमध्ये कधी येणार आहेत, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचेही दार यांनी सांगितले.