Ishan Kishan 250 : ३१ वर्षांचा दुष्काळ संपवला! इशान किशनने ठोकलं ऐतिहासिक द्विशतक; मोडला ३९ वर्षांपूर्वीचा विक्रम
Ishan Kishan 250 : दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने द्विशतक झळकावत ३९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

Ishan Kishan Double Century 250 Runs Duleep Trophy 2026 Final : दुलीप ट्रॉफी २०२६ (Duleep Trophy 2026) च्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने (Ishan Kishan) साऊथ झोनच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी करत नवा इतिहास रचला आहे. चेपॉक स्टेडियमवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इशानने खणखणीत द्विशतक झळकावले. त्याने ३०१ चेंडूंत २७ चौकार आणि ७ षटकारांसह २५० धावांची वादळी खेळी साकारली. यासह दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत कर्णधार म्हणून २५० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याने माजी दिग्गज अंशुमन गायकवाड यांचा १९८७ मधील २१६ धावांचा तब्बल ३९ वर्षे जुना विक्रम मोडला.
३१ वर्षांनंतर ईस्ट झोनकडून द्विशतक; थकव्यामुळे झाला रिटायर्ड हर्ट –
ईस्ट झोनकडून दुलीप ट्रॉफीत तब्बल ३१ वर्षांनंतर द्विशतक झळकले आहे. यापूर्वी १९९५ मध्ये साबा करीम यांनी नाबाद २०० धावा केल्या होत्या. इशानने १२२ व्या षटकात चौकार मारून द्विशतक पूर्ण केले आणि त्यानंतरच्या अवघ्या ३० चेंडूंत ५० धावा कुटल्या. त्रिशतकाकडे कूच करत असताना अतिथकव्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. १३१ व्या षटकात फिजिओंशी चर्चा केल्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्व खेळाडूंनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याला मानवंदना दिली.
कुमार कुशाग्रचे शतक; इशानच्या बॅटमधून तीन शतकी भागीदाऱ्या –
That moment when Ishan Kishan reached 2️⃣5️⃣0️⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/KQf5Km69nk#DuleepTrophy | #SZvEZ pic.twitter.com/6YJYiwNtjV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2026
इशान किशनने डावात तीन मोठ्या भागीदाऱ्या रचून ईस्ट झोनला ६०० च्या पार नेले. त्याने कुमार कुशाग्रसोबत पाचव्या विकेटसाठी २३० धावांची विक्रमी भागीदारी केली; कुशाग्रने १३२ चेंडूंत १०१ धावांची खेळी केली. याशिवाय इशानने शिखर मोहनसोबत (८५) ९४ धावा आणि सहाव्या विकेटसाठी अनुकूल रॉयसोबत (४५) १४० धावांची भागीदारी केली.
ईस्ट झोनचा ६३२ धावांचा महाकाय डोंगर; साऊथ झोन बॅकफूटवर!
An innings of pure class 👌
Watch 🎥 snippets of Ishan Kishan’s fantastic double century so far 💯💯
Scorecard ▶️ https://t.co/KQf5Km69nk#DuleepTrophy | #SZvEZ | @ishankishan51 pic.twitter.com/jOndIaA5Uo
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 7, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी (४४) आणि अभिमन्यू ईश्वरन (७२) यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या होत्या. ३ बाद १४७ अशा स्थितीतून इशान किशनच्या २५० धावांमुळे ईस्ट झोनने पहिल्या डावात ६ बाद ६३२ धावांचा महाकाय डोंगर उभारला. इशानच्या या ऐतिहासिक खेळीने भारतीय कसोटी संघात पुनरागमनासाठी निवडसमितीचे दरवाजे पुन्हा एकदा जोरात ठोठावले आहेत.





