सध्याची लस कोविड 19 च्या व्हायरसशी लढायला सक्षम आहे की नाही? तज्ज्ञ सांगतात…

नवी दिल्ली – भारत सरकारच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमधील करोना विषाणूच्या नव्या रूपाने घाबरून जाण्याची गरज नाही. नीती आयोगाचे सदस्य आणि लसीवरील टास्क फोर्सचे सह-प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनीही काल हे स्पष्ट केले होते.
पॉल यांच्या मते, विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. परंतु यामुळे रूग्ण गंभीरपणे आजारी पडतात, रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यू होणे असे कोणतेही उदाहरण पुढे आलेले नाही. त्यांच्या मते, विषाणूच्या स्वरूपामध्ये बदल असूनही, लस आणि त्याच्या वितरण योजनेच्या प्रभावीतेवर परिणाम होणार नाही.’
अलीकडेच लस बनवणारी भारतीय कंपनी भारत बायोटेकने दावा केला आहे की, नवा व्हायरस आला तरी त्यावरील लस ते सहा आठवड्यांत बनवू शकतात. बायोटेकबरोबरच फायझरनेही असा दावा केला आहे की, त्यांची लस करोना विषाणूच्या नवीन व्हायरसचा सामना करण्यास सक्षम आहे.
वास्तविक, करोना विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत आहेत. यातील एक प्रश्न म्हणजे करोनाची सध्याची लस कोविड 19 च्या व्हायरसशी लढायला सक्षम आहे की नाही? तज्ञांचे मत आहे की सद्यस्थितीत लस या बदललेल्या रूपात कोरोनाशी लढायला सक्षम आहेत.
बायोएनटेक कंपनीचे सह-संस्थापक यूगर साहिन म्हणतात की, ‘वैज्ञानिकदृष्ट्या या लसीची प्रतिकारशक्ती व्हायरसच्या या बदललेल्या प्रकाराला देखील तोंड देण्याची शक्यता आहे.’
एका नवीन अभ्यासानुसार, करोनावर मात केल्यानंतरही त्यांची प्रतिकारशक्ती कमीत कमी आठ महिने संसर्ग टाळण्यास सक्षम असेल. तसे, भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या या बदललेल्या प्रकाराशी संबंधित कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. पण हे नाकारता येणार नाही. कारण यूकेमधून भारतात येणाऱ्या बऱ्याच लोकांना करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.





