Maharashtra Politics : मविआचा एक आमदार फुटणार? संजय राऊतांनी थेट नाव घेत केला धक्कादायक दावा
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील एका आमदाराशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून संपर्क साधण्यात आल्याचा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवान आणि अतिशय नाट्यमय घडामोडी गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. अॅापरेशन टायगर एकनाथ शिंदे यांनी फत्ते केले असून आता अॅापरेशन टायगर ३.० ची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी काळात मोठा राजकीय भूंकप नाही तर महाभूंकप होईल असं मोठं वक्तव्य शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीतील एका आमदाराशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून संपर्क साधण्यात आल्याचा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संबंधित आमदाराला २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी हा दावा केला.
संजय राऊत यांनी थेट नाव घेत सांगितलं की, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे गटाकडून २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असून, आगामी निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती त्यांच्या कानावर आली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
हेही वाचा : Nitesh Rane : नितेश राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?
सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी राम मंदिराच्या निधीचाही उल्लेख केला. “कोणीही अजरामर नाही,” असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
गळती रोखणं हेच सर्वांत मोठं आव्हान
दरम्यान, खासदार आणि आमदारांचे पक्षांतर होत असल्याने ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्षाला लागलेली गळती रोखणे हेच सर्वांत मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असल्याने या बैठकीत नेमक्या काय-काय चर्चा होतात, याकडे लक्ष लागले आहे.
धीरज लिंगाडे कोण आहेत?
धीरज रामभाऊ लिंगाडे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी २०२३ च्या द्वैवार्षिक निवडणुकीत अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करत विजय मिळवला होता. ते सुरुवातीला काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले. २०२३ च्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवड लढवली.





