खाकीत दडलाय ‘ड्रग्ज माफिया’? शिरूरमध्ये २० कोटींचे अमली पदार्थ जप्त; पोलीस हवालदारालाच ठोकल्या बेड्या

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – अमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाईचे चित्र रंगवले जात असतानाच, खुद्द पोलीस यंत्रणेतीलच एक कर्मचारी ड्रग्ज रॅकेटचा कणा असल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलीस आणि पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेने उघड केले. शिरूर परिसरात शिरून केलेल्या मोठ्या कारवाईत १० किलो वजनाचे आणि २० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.
या कारवाईत गुन्हेगारी साखळीत नगर स्थानिक गुन्हे शाखेतील एक पोलीस हवालदार थेट सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याच्यासह पुरवठादार माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर), अन्य एकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुख्य आरोपींपैकी शामसुंदर गुजर (रा. नेप्ती, जि. अहिल्यानगर) हा नगर एलसीबीमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेला हा अधिकारी प्रत्यक्षात ड्रग्जमाफियांचा महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले. गुन्हेगारांवर छापे टाकणाऱ्या यंत्रणेत कार्यरत राहून तो तस्करांना संरक्षण आणि माहिती पुरवत असल्याचा संशय आहे. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तपास यंत्रणांच्या मते, हे रॅकेट केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून त्याचे जाळे आंतरराज्यस्तरावर विस्तारले असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. पोलीस हवालदाराचाच यात सहभाग असल्याने अवैध धंद्याला दीर्घकाळ अभय मिळाले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
कारवाईनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इतर संशयित कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली असून रॅकेटमधील आणखी बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारवाईत नगरमधील पोलीस दलातील अधिकारी, अन्य माफियांचे कनेक्शन समोर आल्याने या ड्रग्जचा विस्तार तळागाळापर्यंत गेल्याची पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे.





