एका झटक्यात 6 हजार जण नोकरी गमावणार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे थेट सरकारी कर्मचाऱ्यांवरच बेरोजगारीची कुऱ्हाड

USA Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये परतल्यापासून अवघ्या महिन्यभरातच अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. एकीकडे जगभरातील अनेक देशांकडून उच्च कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच, देशांतर्गत सरकारी खर्चात देखील मोठी कपात केली जात आहे.
देशांतर्गत सरकारी खर्चात कपात करण्यासाठी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली डिपार्टमेंट ऑफ गर्व्हमेंट इफिशिएन्सीकडून (DOGE) अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मात्र, याचा फटका आता कर्मचाऱ्यांना बसणार आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कामगार कपात सुरू झाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेच्या इंटरनल रेव्हेन्यू सिस्टममधील (IRS) जवळपास 6 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. ही संख्या एकूण आयआरएस कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के आहे.
सध्या अमेरिकेत टॅक्स फाइलिंग प्रक्रिया सुरू आहे. त्यातच अशाप्रकारचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरोप केला जात आहे की, या कपातीमुळे आयआरएस श्रीमंतांच्या प्रकरणांची चौकशी करू शकणार नाही.
ही कपात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापक खर्च कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे. यांतर्गत बँक नियामक, वन कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि इतर हजारो सरकारी कर्मचार्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.
रिपोर्टनुसार, या अंतर्गत आयआरएसमधील 6,700 लोकांना नोकरीवरून काढून टाकले जाणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. या नियुक्तींचा मुख्य उद्देश श्रीमंत करदात्यांवर नजर ठेवणे हा होता. त्यावेळीही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने याचा विरोध करत यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सध्या आयआरएस अंतर्गत जवळपास 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. 2021 मध्ये बायडेन सत्तेत असताना हा आकडा 80 हजार एवढा होता.





