Yelwadi : दीड वर्षांपासून अनियमित वीजपुरवठा; येलवाडीत ग्रामस्थांचे रास्ता रोको
Yelwadi : शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अडचणी

देहूगाव – श्रीक्षेत्र येलवाडी परिसरात गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे आणि तक्रारींची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले.
चाकण महावितरणचे उपअभियंता प्रकाश भोसले यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून वीजपुरवठा नियमानुसार सुरळीत ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीक्षेत्र येलवाडी, सांगुर्डी, खालुंब्रे, म्हाळुंगे, सावरदरी आणि परिसरातील इतर गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या एक ते दीड वर्षांपासून ही समस्या कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांचे नियोजन करणेही कठीण झाले आहे.
अनियमित वीजपुरवठ्याचा फटका छोटे-मोठे व्यावसायिक, दूध व्यावसायिक, किराणा दुकानदार आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांनाही बसत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, दीड वर्ष उलटूनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
यावेळी प्रेमदास भोसले, नंद भसे, संदीप बोत्रे, बाजीराव गायकवाड, बाळासाहेब गाडे, पुरुषोत्तम महाराज मोरे, मारुती भसे, आदिती यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संभाजी शिंदे, रमेश भिसे, संजय बोत्रे, सोपान बोत्रे, प्रकाश गायकवाड, रवि नंदू भसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Pimpri-Chinchwad: हजारो अवैध फटाके स्टॉल; पोलिसांचेही ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष





