Catherine Connolly : आयर्लंडच्या अध्क्षपदी कॅथरीन कॉनोली यांची निवड

लंडन : आयर्लंडच्या दहाव्या अध्यक्षा म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हीदर हम्फ्रे यांच्या विरोधात प्रचंड मतांनी विजय मिळवला. डाव्या विचारांचा प्रभाव असलेल्या कॉनोली या अपक्ष नेत्या आहेत. त्यांना डाव्या विचारांच्या सिन फिन या पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या हम्फ्रे या मध्यवर्ती-उजव्या विचारांच्या फाईन गायेल पक्षाच्या उमेदवार होत्या.
हम्फ्रे यांनी आपला पराभव मान्य केला असून कॉनोली यांचे अभिनंदन केले आहे. कॅथरीन आपल्या सर्वांसाठी अध्यक्ष असतील आणि त्या माझ्यासाठीही अध्यक्षा असतील. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते, असे हम्फ्रे यांनी पत्रकारांना सांगितले. एक अनुभवी राजकारणी असलेल्या कॉनोली या २०१६ साला पासून संसदेत गॅलवे वेस्ट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आयर्लंड संसदेच्या उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पूर्वाश्रमीच्या बॅरिस्टर असलेल्या कॅथरीन या गाझामधील युद्धावरून इस्रायलवर नेहमी टीका करत असतात. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर त्यांनी युरोपीय संघाच्या वाढत्या लष्करीकरणाविरुद्ध इशारा देखील दिला आहे.





