होबार्ट – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या मानल्या जात असलेल्या आयर्लंडने बलाढ्य वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. ( Ireland beat West Indies) या विजयाच्या जोरावर आयर्लंडने स्पर्धेच्या सुपर 12 गटात थाटात प्रवेश केला तर दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 146 धावा केल्या. हे आव्हान आयर्लंडने 17.3 षटकात केवळ एका गड्याच्या मोबदल्यात 150 धावा करत सहज पार केले.
Ireland are through to the Super 12 🎉
A comprehensive performance in Hobart sees them knocking West Indies out of the tournament.#T20WorldCup |#IREvWI | 📝: https://t.co/LTVdRx1Xp2 pic.twitter.com/Fr3quaekYA
— T20 World Cup (@T20WorldCup) October 21, 2022
वेस्ट इंडिजच्या प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केल्यावर ब्रेंडन किंगने जबाबदारीने फलंदाजी करताना नाबाद 62 धावा केल्या. या खेळीत त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 1 षटकार फटकावला. जॉन्सन चार्लसने 24 तर, ओडेन स्मिथने नाबाद 19 धावांची खेळी केली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने 3 गडी बाद केले. सिमी सिंग आणि बॅरीने प्रत्येकी 1 बळी घेतला.
#BackingGreen pic.twitter.com/XLFf9qQxf0
— Cricket Ireland (@cricketireland) October 21, 2022
या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडला पॉल स्टर्लिंग व कर्णधार ऍण्ड्रयु बालबर्ने यांनी 73 धावांची दमदार सलामी दिली. स्थिरावलेला असतानाही बालबर्ने 33 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 23 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. दुसरीकडे स्टर्लिंगने अर्धशतक पूर्ण करताना लॉरकेन टकरच्या साथीत संघाचा विजय साकार केला.
टकरने 35 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 45 धावांची खेळी केली. स्टर्लिंगने नाबाद 66 धावा केल्या. त्यात त्याने 48 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार फटकावले. या विजयामुळे आता आयर्लंडचा संघ बाद फेरीत दाखल झाला आहे. दुसरीकडे अनुभवी वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.