Irani Cup 2025 : विदर्भाने इराणी करंडकावर तिसऱ्यांदा कोरलं नाव! रेस्ट ऑफ इंडियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा

Irani Cup 2025 Vidarbha win the third Irani Cup title : नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर इराणी करंडक 2025 चा फायनल सामना रविवारी रणजी विजेता विदर्भ आणि रेस ऑफ इंडिया यांच्यात पार पडला. या सामन्यात अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भाने रेस्ट ऑफ इंडिया (ROI) संघाला 93 धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठित करंडक जिंकला. यापूर्वी विदर्भाने 2017-18 आणि 2018-19 मध्येही हा करंडक आपल्या नावावर केला होता.
पहिल्या डावात अथर्व तायडेचे दमदार शतक –
या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि त्यांची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर अथर्व तायडेने शानदार शतक झळकावत 143 धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये 15 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्याला यश राठोडने 91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांमधील भक्कम भागीदारीमुळे विदर्भाने पहिल्या डावात 342 धावांचा डोंगर उभा केला. रेस्ट ऑफ इंडियाकडून आकाश दीप आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
यश ठाकूरची भेदक गोलंदाजी –
𝘾.𝙃.𝘼.𝙈.𝙋.𝙄.𝙊.𝙉.𝙎 🏆
Congratulations and a round of applause for Vidarbha on winning the Irani Cup for the 3rd Time 🙌@IDFCFIRSTBank | #IraniCup pic.twitter.com/PhqYs8cRwh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 5, 2025
रेस्ट ऑफ इंडिया फलंदाजीसाठी उतरला असता विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांना संधीच दिली नाही. रेस्ट ऑफ इंडियाचा डाव अवघ्या 214 धावांवर आटोपला. कर्णधार रजत पाटीदारने 66 धावा आणि अभिमन्यू ईश्वरनने 52 धावा केल्या. मात्र, यश ठाकूरने 4 विकेच्स घेत भेदक गोलंदाजी केली, तर हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत विदर्भाला मजबूत स्थितीत आणले.
हेही वाचा – IND W vs PAK W : हरमनप्रीतने सूर्याच्या पावलावर ठेवलं पाऊल, पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करणं टाळलं
हर्ष दुबे आणि यश ठाकूरच्या दमदार गोलंदाजी –
पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावातही संयमी फलंदाजी केली. संघाने 232 धावा जोडल्या आणि रेस्ट ऑफ इंडियासमोर 361 धावांचे आव्हान ठेवले. रेस्ट ऑफ इंडियाने शेवटच्या डावात चिवट झुंज दिली, पण त्यांचा डाव 267 धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात हर्ष दुबे याने 4 विकेट्स घेतल्या, तर यश ठाकूर आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत रेस्ट ऑफ इंडियाच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळवल्या.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहितने मनाचा मोठेपणा दाखवला, तरीही एवढी घाई का?’, मोहम्मद कैफचा बीसीसीआयला संतप्त सवाल
विदर्भाने तिसऱ्यांदा इराणी करंडकावर कोरलं नाव –
या विजयासह विदर्भाने इराणी करंडकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. अथर्व तायडेचे शतक आणि यश ठाकूरची घातक गोलंदाजी यामुळे विदर्भाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नागपूरच्या खेळपट्टीवर विदर्भाच्या या दमदार कामगिरीने देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांचे वाढते वर्चस्व अधोरेखित झाले आहे.





