Iran-US peace Deal: जगभरातून शांततेचे स्वागत ; इराण-अमेरिका करारावर ब्रिटन, पाकिस्तान, फ्रान्ससह अनेक देशांची मोठी प्रतिक्रिया
Iran-US peace Deal: मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात एक करार झाला आहे.

Iran-US peace Deal: मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात एक करार झाला आहे. या वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक निवेदन जारी करून याची घोषणा केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून अमेरिका आणि इराण यांच्यात करार झाल्याचे सांगितले. इराणच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनीही या कराराला दुजोरा दिला.
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून, “या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ते अमेरिका, इराण आणि या प्रदेशातील इतर भागीदारांसोबत काम करतील.” असे म्हटले आहे.
E4 गटाने आपल्या निवेदनात, “या राजनैतिक यशाबद्दल ते अमेरिका, इराण सरकार आणि पाकिस्तान, कतार व इतर मध्यस्थ देशांसह या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व पक्षांचे अभिनंदन करत आहे” असे म्हटले आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांनी काय म्हटले? (Iran-US peace Deal )
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटरवर, “विस्तृत वाटाघाटींनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याची घोषणा करताना त्यांना आनंद होत आहे” असे त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, “दोन्ही बाजूंनी लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाई तात्काळ आणि कायमस्वरूपी थांबवण्याची घोषणा केली आहे.”
ब्रिटिश पंतप्रधानांचे निवेदन
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी या कराराचे स्वागत करत, “अमेरिका आणि इराण यांच्यात आज झालेला करार हा युद्ध संपवण्यासाठी, प्रदेशात स्थिरता आणण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.” असे म्हटले आहे.
त्यांनी या यशाबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तसेच पाकिस्तान, कतार आणि इतर मध्यस्थांचे अभिनंदन केले. तसेच, “तणाव कमी करण्याची बऱ्याच काळापासून मागणी होती आणि ही अपेक्षित असलेली सकारात्मक प्रगती आहे” असेही म्हटले.

Iran-US peace Deal: जगभरातून शांततेचे स्वागत ; इराण-अमेरिका करारावर ब्रिटन, पाकिस्तान, फ्रान्ससह अनेक देशांची मोठी प्रतिक्रिया
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निर्णयाचे स्वागत केले
फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या कराराचे स्वागत केले. त्यासाठी त्यांनी, “हा अनेक देशांच्या राजनैतिक प्रयत्नांचा परिणाम आहे” असे म्हटले. तसेच त्यांनी सर्व पक्षांना या कराराची जलद आणि पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
मॅक्रॉन म्हणाले की, या करारानंतर होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि कोणत्याही अटींशिवाय पुन्हा सुरू केली जाऊ शकते. त्यांनी सांगितले की, युनायटेड किंगडमच्या सहकार्याने स्थापन केलेले आंतरराष्ट्रीय मिशन या प्रक्रियेत मदत करण्यास तयार आहे. आवश्यक संसाधने उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय सागरी वाहतूक पुन्हा सुरू करणे हे प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे.
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या (Iran-US peace Deal)
अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराच्या घोषणेनंतर आशियाई बाजारात सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची तयारी सुरू आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी असेही सांगितले की, अमेरिका-इराण कराराचा भाग म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळासाठी खुली ठेवण्याच्या मुद्द्यावर या आठवड्यात फ्रान्समधील एव्हियन येथे होणाऱ्या जी-७ नेत्यांच्या बैठकीत चर्चा केली जाईल.
इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांचे निवेदन
इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील सामंजस्य कराराच्या मसुद्यावर एकमत होण्यासाठी कतारी मध्यस्थांनी तेहरानमध्ये सुमारे १४ ते १५ तास वाटाघाटी केल्या. त्यांनी सांगितले की, अंतिम करारावर पुढील ६० दिवसांत वाटाघाटी होतील. या काळात इराण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करेल, ज्यामध्ये त्याच्यावर लादलेले सर्व निर्बंध हटवणे हे त्याचे सर्वोच्च प्राधान्य असेल.





