Strait of Hormuz : अमेरिका आणि इराण दरम्यान अणू कार्यक्रमाबाबत जिनिव्हा येथे चर्चेची दुसरी फेरी सुरू असतानाच इराणने होर्मूझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सागरी वाहतुकीसाठी तात्पुरती बंद केली आहे. या सामुद्रधुनीमध्ये थेट गोळीबाराचा लष्करी सराव घेतला जाणार असल्याने काही तासांसाठी इराणने या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक बंद केली आहे. या सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांचा सराव सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सागरी सुरक्षिततेसाठी हा महत्वाचा मार्ग काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे इराणने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पहिल्यांदाच बंद केली आहे. हा मार्ग तेलाच्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. जगभराच्या तेलाच्या सागरी वाहतुकीपैकी २० टक्के वाहतूक याच मार्गाने केली जाते. इराणने होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रत्यक्ष क्षेपणास्त्र माऱ्याचा सराव काही आठवड्यांपुर्वी देखील केला होता. पण त्यासाठी हा मार्ग बंद केल्याची घोषणा केली नव्हती. यावेळी मात्र इराणच्या भूमीवरून होर्मूझच्या सामुद्रधुनीमधील लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अमेरिकेकडून सातत्याने इराणविरोधात लष्करी कारवाईचा इशारा दिला जात असताना इराणने हा मार्ग बंद करून अमेरिकेला थेट इशारा दिला असल्याचे बोलले जाते आहे. अमेरिकेकडून जर सागरी मार्गाने हल्ले झाले, तर त्याला प्रत्युत्तर देण्याची पुर्वतयारी म्हणून हा लष्करी सराव इराण घेत असल्याचाही अंदाज आहे.