इक्बाल मिर्चीची 22 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – हयात नसलेला गॅंगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल 22 कोटींची मालमत्ता आज सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये एक चित्रपटगृह, मुंबईतील हॉटेल, बांधकाम सुरू असलेले एक हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीमधील 3.5 एकर भूखंडाचाही समावेश आहे.
मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले असल्याचे “ईडी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य 22.42 कोटी रुपये आहे. त्यात बॅंकांमधील 7 खात्यांवर ठेवलेल्या ठेवींचाही समावेश आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी आतापर्यंत 798 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये पूर्वी जप्त केलेल्या विदेशातील 203 कोटी रुपयांच्या मालमत्तांचाही समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा इक्बाल मिर्ची 2013 मध्ये लंडनमध्ये मरण पावला. अंमलीपदार्थांची तस्करी आणि खंडणीच्या गुन्ह्यांमधून मिर्चीने जगभरात प्रचंड मालमत्ता मिळवली होती. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक मालमत्तांची अप्रत्यक्ष मालकी मिर्चीने मिळवली होती, असे “ईडी’ने पूर्वी म्हटले होते. “ईडी’ने गेल्या वर्षी मिर्ची, त्याचे कुटुंबीय आणि इतरांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगशी संबंधित गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण दाखल केले होते.
मुंबई पोलिसांनी मिर्चीविरोधात दाखल केलेल्या अनेक “एफआयआर’वर मनी लॉन्डरिंगशी संबंधित प्रकरण आधारलेले आहे. “ईडी’ने या संबंधात मुंबईतील न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले असून न्यायालयाने मिर्चीचा मुलगा असिफ मेमन आणि जुनैद मेमन यांच्यासह मिर्चीची पत्नी हाजरा मेमन यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंटही बजावले आहे.





