IPS Tushar Doshi : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या सभेच्या दिवशीच गृह विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तुषार दोशी यांची रवानगी आता शेजारच्या सांगली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली असून, त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून धुरा सांभाळणार आहेत. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी मोठा गदारोळ झाला होता. या गोंधळात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते, ज्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. रजेवरून परतल्यानंतर काही दिवसांतच आता त्यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांचीही बदली – गृह विभागाने तुषार दोशी यांच्यासह पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले आहेत. यामध्ये सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (सुरक्षा) पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल आता कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक असतील. जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुणे सीआयडीमध्ये बदली झाली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पुण्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील या प्रशासकीय फेरबदलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.