#IPL2024 : मुंबईचा कर्णधार रोहित की पंड्या? संधी हुकल्याने बुमराह नाराज…

मुंबई – हार्दिक पंड्या आयपीएल स्पर्धेसाठी पुन्हा मुंबई इंडियन्सकडे परतल्याने आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुबंईला पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिलेला रोहित शर्मा पुढील वर्षीच्या मोसमातही कर्णधारपदी कायम राहणार की, गुजरातला पदार्पणातच विजेतेपद मिळवून देत आता परत घरवापसी केलेला पंड्या नेतृत्व करणार. मुंबईच्या सुत्रांनी असे संकेत दिले आहेत की मोमाच्या सुरुवातीला रोहितच नेतृत्व करेल व अखेरच्या टप्प्यात तो पंड्याकडे ही जबाबदारी सोपवेल.
एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर खुद्द रोहितनेच टी-२० प्रकारातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, तो आयपीएल स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करणार की पुढील वर्षी वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर निर्णय जाहीर करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर त्याने निर्णय घेतला तर पंड्या हाच मुंबईचा भावी कर्णधार असेल असेही सांगितले जात आहे.
पंड्या दोन वर्षे गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याच्या कर्णधारपदाच्या पहिल्याच मोसमात गुजरातने विजेतेपद पटकावले होते. तसेच यंदाच्या वर्षीही संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पंड्याबाबत असे बोलले जात आहे की तो रोहित शर्माचा वारसदार म्हणून गणला जात आहे. तरीही सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की २०२४ सालच्या मोसमात रोहित नेतृत्व करणार की पंड्या. पंड्याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडूनच केली होती. त्यामुळे तो मुंबईकडे परतला ही एकप्रकारे घरवापसीच झाली आहे. २०२० साली त्याने गुजरात टायटन्स या नवीन संघात संधी मिळत असल्याने तसेच नेतृत्वही मिळण्याचे निश्चित झाल्याने त्याने मुंबई सोडली.
पंड्याला काय आश्वासन दिले ते गुलदस्तात
पंड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील करारात काय निश्चित झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जर कर्णधारपद त्याच्याकडे सोवले जाणार नसेल तर आधीच्या संघाला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार केवळ एक खेळाडू म्हणून घरवापसी करणार नाही हे उघड आहे. त्यामुळेच रोहितच्या नेतृत्वालाच सुरुंग लागणार अशीच चिन्हे दिसत आहेत. रोहितने मुंबईला पाचवेळा विजेतेपद मिळवून दिले असल्याने लगेचच त्याच्याकडून नेतृत्व काढून घेणेही शक्य नसल्याने पहिल्या टप्प्यात रोहित तर अखेरच्या टप्प्यापासून पंड्या नेतृत्व करेल असे सांगितले जात आहे.
संधी हुकल्याने बुमराहही नाराज
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्यावर आपल्या कर्णधारपदाची संधी हुकल्यामुळे जसप्रीत बुमराह नारा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रोहितने संघाचे नेतृत्व सोडले तर त्याची जबाबदारी बुमराहकडेच सोपवली जाणार होती, असे संकेत मिळत होते. मात्र, आता बुमराहनेच सोशल मीडिया हॅंडलवर एक पोस्ट केली असून, यापुढे काही वेळा सांत राहणेच उत्तम असा संदेश पोस्ट केला आहे. त्यामुळे पंड्या मुंबई संघात दाखल झाल्यामुळे त्याची कर्णधारपदाची संधी हुकल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलची ट्रेडिंग विंडो येत्या १२ डीसेंबरपर्यंत खुली राहणार असल्यामुळे येत्या काळात आणखी एक नाट्यमय घटना घडू शकते व चक्क बुमराह देखील अन्य कोणत्या संघाचा भाग बनलेला दिसल्यास नवल वाटणार नाही.





