#IPL2023 #Eliminator #LSGvMI : मुंबई इंडियन्सचा लखनौवर शानदार विजय

चेन्नई – IPL 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 182 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौचा संघ 16.3 षटकात सर्वबाद केवळ 101 धावाच करू शकला. आकाश मढवाल याने 3.3 षटकात 5 धावा देत 5 विकेट काढल्या. त्यामुळे विजयासाठी 183 धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 40 धावा केल्या.
या सामन्यातील पराभवाने लखनौचे प्लेऑफमध्ये पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले. या संघाने गेल्या वर्षी एलिमिनेटर सामनाही खेळला होता आणि त्यात पराभव झाला होता.
तत्पूर्वी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 182 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक 41 धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादव याने 33 धावांचं योगदान दिलं. तिळक वर्मा याने 26 धावा जोडल्या. नेहल वढेरा याने अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 23 धावांची खेळी केली. इशान किशन 15 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन रोहित शर्माने 11 धावा केल्या. टीम डेव्हिडने 13 धावा जोडल्या.
लखनौकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नवीन व्यतिरिक्त यश ठाकूर या युवा गोलंदाजाने पुन्हा आपली छाप पाडली. यशने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खानने 1 विकेट घेतली.





