#IPL2022 | गुणतालिकेत प्रगतीसाठी ‘या’ दोन्ही संघांना विजय आवश्यक

मुंबई – सलग दोन सामन्यांत पराभव पत्करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा संघ विजयी पुनरागमनासाठी उत्सुक असून सोमवारी आयपीएलमध्ये त्यांच्यापुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान राहिल. कोलकाताचा संघ आता सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ पाच सामन्यांत सहा गुणांसह 5 व्या स्थानावर आहे.
कोलकाताच्या आंद्रे रसेलने यंदा अष्टपैलू कामगिरी करताना 179 धावा केल्या असून पाच बळीही मिळवले आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. गोलंदाजीत उमेश यादव वगळता इतरांना छाप पाडता आलेली नाही. जोस बटलर आणि यजुवेंद्र चहल या राजस्थानच्या खेळाडूंनी यंदा चमकदार कामगिरी केली आहे. बटलरला शेमरन हेटमायरची (197 धावा) चांगली साथ लाभली आहे.

यंदाच्या स्पर्धेत कोलकाताने सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यातही कर्णधार अय्यरच्या नेतृत्वातील चमकही सातत्याने दिसली आहे. त्यांना काही सामने गमवावे लागले असले तरीही ते राजस्थानविरुद्ध मोठे आव्हान उभे करु शकतात. यंदाच्या स्पर्धेत अय्यर पहिल्यांदाच कोलकाताचे नेतृत्व करत असला तरीही त्याना नेतृत्वाचा अनुभव आहे.
गेल्या मोसमात त्याच्याकडे दिल्ली संघाचेही नेतृत्व होते. त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती व दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे आले होते. त्यानंतर त्याला दिल्ली संघाने रिलीज केले होते व लिलावात त्याला कोलकाताने आपल्याकडे घेतले.
दुसरीकडे राजस्थान संघाला यंदाच्या मोसमात संमिश्र यश मिळाले आहे. त्यांचा कर्णधार संजू सॅमसन याच्या खेळात सातत्याचा अभाव जवळपास प्रत्येक सामन्यात दिसून आला आहे.
यंदाच्या स्पर्धेत जर राजस्थानला प्लेऑफ गटात पात्र ठरायचे असेल तर त्यांना केवळ हाच सामना नव्हे तर पुढील प्रत्येक सामना जिंकवा लागेल व गुणतालिकेत 16 गुणांसह आपली दावेदारी भक्कम करावी लागेल.





