#IPL2022 #KKRvMI : कमिन्सच्या वादळात मुंबईचा धुव्वा

पुणे – आयपीएल स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील सर्वात वादळी फलंदाजी बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात दिसली. कोलकाताचा अष्टपैलू पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 56, तर व्यंकटेश अय्यरनेही फटकावलेले अर्धशतक मुंबईला चांगलेच महागात पडले.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या एकवेळ 5 बाद 101 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पॅट कमिन्स व व्यंकटेश अय्यर यांनी सहाव्या गड्यासाठी 61 धावांची अखंडित भागीदारी केली व कोलकाताला 16 व्या षटकांत 5 बाद 162 धावा करत विजय मिळवून दिला. व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावत नाबाद 50 धावा केल्या. कमिन्सने केवळ 15 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 6 षटकारांच्या आतषबाजीने नाबाद 56 धावा केल्या.
तत्पूर्वी, दुखापतीतून पूर्ण बरा होऊन संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला साथीला घेत मुंबई इंडियन्सला 4 बाद 161 धावांची समाधानकारक मजल मारून दिली. अखेरच्या षटकांत अवघे 5 चेंडू खेळत कॅरन पोलार्डने वादळी 22 धावांची खेळी केली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हीसने 19 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली.
लगेचच इशान किशनही परतला. यावेळी मुंबईची अवस्था 3 बाद 55 अशी बिकट बनली होती. मात्र, सूर्यकुमारने तिलक वर्माला साथीला घेत संघाचा डाव सावरला. सूर्यकुमार 36 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. त्याने वर्मासह चौथ्या गड्यासाठी 49 चेंडूत 83 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यावर कॅरन पोलार्डने वर्माला साथ दिली.
पोलार्डने अवघ्या 5 चेंडूंचा सामना करताना 3 षटकारांसह नाबाद 22 धावा केल्या. वर्माने 27 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावताना नाबाद 38 धावा केल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अवघ्या 5 चेंडूत 23 धावांची भागीदारी केली व संघाला दीडशतकी धावांपेक्षा जास्त मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 4 बाद 161 धावा. (डेवाल्ड ब्रेव्हीस 29, सूर्यकुमार यादव 52, तिलक वर्मा नाबाद 38, कॅरन पोलार्ड नाबाद 22, पॅट कमिन्स 2-49, उमेश यादव 1-25, वरुण चक्रवर्ती 1-32). कोलकाता नाईट रायडर्स – 16 षटकांत 5 बाद 162 धावा. (पॅट कमिन्स नाबाद 56, व्यंकटेश अय्यर नाबाद 50, मुरुगन अश्विन 2-25, टायमल मिल्स 2-38, डॅनियल सॅम्स 1-50).





