#IPL2021 #RRvCSK | राजस्थानच ‘रॉयल’

अबुधाबी – आयपीएल 2021 हंगामात शनिवारी डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने केलेली नाबाद 101 धावांची खेळी व्यर्थ ठरली. चेन्नई सुपर किंग्जने दिलेले आव्हान राजस्थान रॉयल्सने 17.3 षटकात 3 बाद 190 धावा करत 7 विकेटस्नी विजय मिळविला.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना एविन लेवीस आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने 77 धावांची दमदार भागीदारी केली. ही जोडी जमली असताना एविन बाद झाला. त्याने 12 चेंडूत 27 धावा केल्या. त्यानंतर लगेचच यशस्वी 50 धावांवर बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतरही संघावरील दडपण दूर करत संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर शिवम दुबेने 42 चेंडूत नाबाद 64 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात करून दिली, पण डू प्लेसिस 7व्या षटकात 25 धावांवर राहुल तेवतियाच्या चेंडूवर यष्टिचीत झाला. त्यामुळे सलामीची 47 धावांची भागीदारी तुटली.
त्यानंतर फलंदाजीला आलेला सुरेश रैना फार काळ टिकला नाही. त्याला तेवतियाने 3 धावांवर शिवम दुबेकडे झेल देण्यास भाग पाडले, पण यानंतर मोईन अलीने ऋतुराजला चांगली साथ दिली. ऋतुराजने 14व्या षटकात त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याने आयपीएल 2021 हंगामातील चौथे अर्धशतक ठरले. ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीची जोडी मैदानावर जमली असतानाच राहुल तेवतियानेच मोईनला 21 धावांवर बाद केले. त्यामुळे चेन्नईच्या 15 षटकांत 3 बाद 116 धावा झाल्या.
दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 101 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने नाबाद 32 धावा करत त्याला सुरेख साथ दिल्याने 20 षटकांत 4 बाद 189 धावा उभारल्या.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 4 बाद 189 (ऋतुराज गायकवाड नाबाद 101, फाफ डू प्लेसिस 25, मोईन अली 21, रवींद्र जडेजा नाबाद 32. राहुल तेवतिया 3-39, चेतन साकारिया 1-31) राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 3 बाद 190 (यशस्वी जैस्वाल 50, संजु सॅमसन 28, शिवम दुबे नाबाद 64. शार्दुल ठाकूर 2-30)





