रोहित शर्माने वचन पूर्ण केलं! ‘मुंबईचा राजा’ने ‘युवराज’ला भेट दिली ४.५ कोटींची लॅम्बोर्गिनी, पहा व्हिडीओ

मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने सोमवारी (दि. १९) ड्रीम११ फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या युवराज वाघ याला आपली आलिशान निळी लॅम्बोर्गिनी उरुस भेट म्हणून दिली. ‘हिटमॅन’ रोहितला यापूर्वी अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर या शानदार कारमधून फिरताना पाहिले गेले आहे. या खास प्रसंगी रोहितने स्वतः विजेत्याला कारची चावी सुपूर्द केली.
रोहितच्या या लॅम्बोर्गिनीचे रजिस्ट्रेशन क्रमांक ‘MH 01 EB 264’ आहे, जो त्याच्यासाठी विशेष आहे. रोहितने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेला २६४ धावांचा विक्रमी डाव या क्रमांकामुळे त्याच्या कारच्या नंबरप्लेटवर झळकतो. सुमारे ४.५ कोटी रुपये किमतीची ही लॅम्बोर्गिनी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
वचनाची पूर्तता –
आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला रोहितने ड्रीम११ च्या जाहिरात मोहिमेत आपली कार भेट देण्याचे वचन दिले होते. ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. जाहिरातीचे दोन भाग होते. पहिल्या भागात रोहित भावूक होऊन कार भेट देण्याची घोषणा करताना दिसला, तर दुसऱ्या भागात एक चाहता लॅम्बोर्गिनी घेऊन निघून जातो आणि रोहितला ऑटोरिक्षाने घरी परतावे लागते.
— R✨ (@264__ro) May 19, 2025
सुरुवातीला चाहते गोंधळात होते की रोहित आपलीच कार देणार की नवी कार भेट देणार. मात्र, सोमवारी समोर आलेल्या दृश्यांमुळे स्पष्ट झाले की ‘मुंबईचा राजा’ने आपले वचन पूर्ण केले. कार जिंकणाऱ्या व्यक्तीचे नाव युवराज वाघ आहे.
आयपीएल २०२५ मधील प्लेऑफची लढाई –
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये सुरुवातीला संथ कामगिरी केली, पण नंतर सावरत प्लेऑफच्या शर्यतीत जोरदार प्रवेश केला. १२ सामन्यांत १४ गुणांसह मुंबई इंडियन्सने आपली कामगिरी उंचावली आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.
मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून कडवी टक्कर मिळत आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांनी आधीच प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना बुधवारी (दि. २१) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.





