IPL 2025 : आयपीएलच्या पुढील हंगामात होऊ शकतात 3 मोठे बदल, मेगा लिलावापूर्वी संघांच्या अधिकाऱ्यांची झाली बैठक….

Indian Premier League 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 ची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल संघांच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच स्पर्धेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत फ्रँचायझींनी तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. यातील पहिला मुद्दा असा होता की दर 5 वर्षांनी मेगा लिलाव आयोजित केला जाईल. यासोबतच संघांना 4 ते 6 खेळाडू कायम ठेवण्याची (Retain Player) परवानगी द्यावी. या बैठकीत आणखी एक मुद्दा मांडण्यात आला, जो अत्यंत महत्त्वाचा होता.
आयपीएल फ्रँचायझींना तीन वर्षांच्या ऐवजी पाच वर्षांच्या अंतराने मेगा लिलाव करायचा आहे. यासोबतच प्रत्येक संघाला किमान 8 राईट टू मॅच (RTM) चा पर्याय दिला जाईल. याद्वारे, संघ मेगा लिलावादरम्यान कोणत्याही खेळाडूवर लावलेल्या सर्वोच्च बोलीशी जुळवून त्यांच्या संघासाठी एक खेळाडू खरेदी करू शकतात.
संघांना 5 वर्षांनंतर मेगा लिलाव का हवा आहे?
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, फ्रँचायझीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, याचा संघांना फायदा होईल. जेव्हा संघांना लिलावासाठी जास्त काळ मिळतो तेव्हा तरुण खेळाडू तयार करता येतात. अनकॅप्ड खेळाडूंना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मात्र आता दर तीन वर्षांनी मेगा लिलाव होत आहे.
संघांना वाढवायचा आहे आरटीएम (RTM) पर्याय…
आयपीएल फ्रँचायझींना आरटीएम (RTM) पर्याय 8 पर्यंत वाढवायचा आहे. याचा फायदा खेळाडूंनाही होणार आहे. लिलावादरम्यान संघ त्यांचे प्रमुख खेळाडू पुन्हा खरेदी करू शकतील. सर्वोच्च बोलीच्या किंमतीशी जुळवून घेऊन त्याला संघात परत आणता येईल. आयपीएल अधिकारी आणि फ्रँचायझी यांच्यात झालेल्या बैठकीत हे सर्व मुद्दे महत्त्वाचे होते. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावेळी अनेक संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. त्यामुळे मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू इकडे तिकडे असू शकतात. संघ काही मोठ्या खेळाडूंनाही सोडू शकतात.





