ऑपरेशन सिंदूरनंतर PBKS vs MI सामन्याचे ठिकाण अचानक बदलले, काय आहे कारण?

PBKS vs MI match shifted from Dharamshala to Ahmedabad : आयपीएल २०२५ मध्ये रविवार ११ मे रोजी धर्मशाला येथे होणारा पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ही माहिती दिली आहे. हा सामना आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना ११ मे रोजी दुपारी ३.३० वाजता अहमदाबाद येथे खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हा सामना धर्मशालाहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे. कारण भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण असल्याने धर्मशाला विमानतळासह अनेक महत्त्वाची विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत.
🚨 IPL MATCH IN AHMEDABAD. 🚨
⚡ PBKS Vs MI on 11th May has been shifted to Ahmedabad.#MIvsPBKS #PBKSvsMI pic.twitter.com/ZQz9Bs4Y1q
— The Sports Feed (@thesports_feed) May 8, 2025
गुजरातने बीसीसीआयची मान्य केली विनंती –
विमान सेवा बंद असल्याने आयपीएल संघांना प्रवास करण्यात अडथळे येत असल्याने पंजाब आणि मुंबई सामन्याचे स्थळ बदलण्याच आले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल म्हणाले की, बीसीसीआयने आम्हाला विनंती केली होती आणि आम्ही ती स्वीकारली. मुंबई संघ आज संध्याकाळी येथे पोहोचत आहे आणि पंजाब दौऱ्याचे वेळापत्रक नंतर कळेल. गुरुवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना होणार आहे.
हेही वाचा – KKR vs CSK : डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या वादळी खेळीच्या जोरावर सीएसकेने मारली बाजी, केकेआरच्या वाढल्या अडचणी
भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त केले तळ –
बुधवारी सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी लाँच पॅडवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद आणि मुरीदकेमधील लष्कर-ए-तोयबाचा बालेकिल्ला समाविष्ट आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला आहे.





