IPL 2025 : केकेआरची धुरा दुसऱ्यांदा मुंबईकराच्या हाती; ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी

आयपीएल 18 व्या सीझनला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या सिझनमध्ये 10 संघांमध्ये 13 शहरांमध्ये 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. या वर्षी अनेक संघाचे कर्णधार आपल्याला बदललेले पाहायला मिळतील. काही संघांनी त्यांच्या नव्या कर्णधारांची नावं घोषित केली. तर कोलकाता नाईट रायडर्सने आज आपल्या कर्णधारपदाची घोषणा केली आहे. कर्णधारपदासाठी रिंकू सिंह आणि अजिंक्य रहाणे यांची नावे मोठ्या प्रमाणात चर्चेत होती.
मुंबईकराच्या हाती कोलकाताची कमान
मुंबईकर अजिंक्य रहाणे याची कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या वर्षी श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमात केकेआरला तब्बल 12 वर्षांनी ट्रॉफी जिंकून दिली होती. मात्र त्यानंतरही टीम मॅनजमेंटने श्रेयस अय्यर याला करारमुक्त केलं. श्रेयस अय्यरदेखील मुंबईकर आहे. यानंतर कोलकाताने कर्णधारपदाची धुरा एका मुंबईकराकडे सोपवली आहे.
रहाणे मेगा ऑक्शनमधील पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला होता. रहाणेला 10 पैकी एकाही संघाने घेण्यास रस दाखवला नाही. मात्र त्यानंतर केकेआरने रहाणेला झटपट फेरीतून 1 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. केकेआरने श्रेयसला करारमुक्त केल्याने मेगा ऑक्शननंतर आता कर्णधार कोण असणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. संघात अजिंक्य रहाणे अनुभवी खेळाडू असल्याने त्याचं नाव आघाडीवर होतं. तसेच वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंह या दोघांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र अखेर रहाणेची कर्णधारपदी तर वेंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अजिंक्य रहाणेच्या आयपीएलमधील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएलमध्ये 185 सामने खेळले आहेत. रहाणेने 185 सामन्यांमधील 171 डावांत 123.42 च्या स्ट्राईक रेटसह आणि 30.14 च्या सरासरीने 4 हजार 642 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ :
वेंकटेश अय्यर (उपकर्णधार) , क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली, अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि लवनीथ सिसोदिया.
रिटेन खेळाडू : सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह आणि रिंकू सिंह.





