मुंबई : थोड्याच वेळात आयपीएलच्या 18 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. या सिझनमधील पहिला सामना आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात पार पडणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनवर होणार आहे. आयपीएलमध्ये चाहत्यांना एका पेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळतात. मात्र बीसीसीआयने यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धेसंदर्भात काही नियम बदलले आहेत तर काही नवीन नियम लागू केले आहेत. सुपर ओव्हर संदर्भातील नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घेऊया या नियमाबद्दल
सुपर ओव्हर संदर्भातील नियम
आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक वेळा सुपर ओव्हर्स खेळवण्यात आल्या आहेत. दोन्ही संघांच्या धावा समान असताना सुपर ओव्हरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी प्रत्येकी एक षटक सुपर ओव्हरमध्ये खेळवला जातो. पण नवीन हंगामापूर्वी, बोर्डाने याबद्दल प्रतिबंधात्मक नियम आणला आहे. आता सामना संपल्यानंतर एका तासाच्या आत सामन्याचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे एका तासात शक्य तितके सुपर ओव्हर्स खेळवले जातील.
तसेच सामना संपल्यानंतर 10 मिनिटांच्या आत सुपर ओव्हर सुरू होणे आवश्यक आहे. जर पहिली सुपर ओव्हर टाय झाली तर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.मात्र ही सुपर ओव्हर पहिल्या सुपर ओव्हरनंतर लगेच ५ मिनिटांत सुरु करावी लागेल. जर दोन सुपर ओव्हर्सनंतरही निर्णय झाला नाही, तर त्या एका तासात अजून किती वेळ शिल्लक आहे हे पाहिले जाईल. जर पुरेसा वेळ बाकी असेल तर तिसरी सुपर ओव्हर खेळवली जाईल. पण, जर पंच किंवा पंचांना असे वाटत असेल की एक तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे तर ते सामना टाय झाला असे जाहीर करून दोन्ही संघाना १ -१ गुण देतील.
तसेच जर एकापेक्षा जास्त सुपर ओव्हर असतील तर मागील सुपर ओव्हरमध्ये आऊट झालेला फलंदाज पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकणार नाही. त्याचप्रमाणे, मागील सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील तो ओव्हर टाकू शकणार नाही. क्षेत्ररक्षण करणारा संघ चेंडू निवडू शकेल, परंतु त्यांना नवीन चेंडू मिळणार नाही. जर एकापेक्षा जास्त सुपर ओव्हर असतील तर त्या सर्वांमध्ये एकच चेंडू वापरण्यात येईल.
जर एखादा फलंदाज सुपर ओव्हरमध्ये दुखापत न होता निवृत्त झाला, तर त्याला निवृत्त समजले जाईल आणि तो पुन्हा फलंदाजी करू शकणार नाही. सुपर ओव्हरमध्ये सामन्याच्या शेवटच्या षटकाइतकेच क्षेत्ररक्षण निर्बंध असतील. याचा अर्थ असा की सामन्याच्या शेवटच्या षटकात जितके क्षेत्ररक्षक होते तितकेच क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्यात येणार आहेत.