IPL 2024: ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड का ठोठावला? पुढचा सामना खेळण्यावरही घातली बंदी

नवी दिल्ली – दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर आयपीएलच्या एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो 7 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएलने त्याला दंड ठोठावला आहे. यासोबतच त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती. (IPL 2024: Rishabh Pant Fined For Breaching IPL Code Of Conduct, Faces One Match Suspension As Penalty)
स्लो ओव्हर रेटसाठी पंतने तिसऱ्यांदा आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यावर बंदी आणि 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तर इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना मॅच फीच्या 50 टक्के किंवा 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार दिल्ली कॅपिटल्सने सामनाधिकारींच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले होते. यानंतर हे अपील बीसीसीआय लोकपालकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आले. यानंतर लोकपालने या प्रकरणाची व्हर्च्युअली सुनावणी घेतली. यानंतर मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला गेला.
डीसी प्लेऑफच्या शर्यतीत कायम
दिल्ली अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. दिल्ली 12 सामन्यांतून 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. रविवारी पुढील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. 12 मे रोजी होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ पंतविना खेळणार आहे.
आयपीएलमध्ये दंड प्रक्रिया
स्लो ओव्हर रेटशी संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, जर एखाद्या संघाच्या कर्णधाराने पहिला गुन्हा केला तर त्याला 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. त्या कर्णधाराने सीझनमध्ये दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केल्यास 24 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. तिसऱ्यांदा चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी आणि 30 लाखांचा दंड ठोठावला जातो.





