IPL 2023 : वॉर्नर आयपीएल सोडून मायदेशी परतणार

मेलबर्न – ऑस्ट्रेलियासाठी ऍशेस कसोटी मालिका व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना किती महत्त्वाचा आहे ते आता समोर आले आहे. या स्पर्धेपूर्वी कसून सराव व्हावा व संघातील प्रत्येक खेळाडूने त्यात असलेच पाहीजे, असे संकेत देत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या डेव्हीड वॉर्नरला परत बोलावले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपीएल स्पर्धेत वॉर्नर दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. तो जर मायदेशी परतला तर दिल्ली संघाचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच कार अपघातात जखमी झालेला त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंत अद्याप पूर्ण बरा झालेला नाही. मात्र, असे सगळे चित्र असले तरीही खुद्द वॉर्नरलाही ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील आपले स्थानही टीकवायचे असल्याने तो मायदेशी परतणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
आयपीएल स्पर्धा संपल्यावर 7 जुनपासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना संपल्यावर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध ऍशेस कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धा तसेच ऍशेस मालिका यांसाठी ऑस्ट्रेलियाने नुकताच आपला संघ जाहीर केला होता व त्यात वॉर्नरलाही स्थान देण्यात आले आहे. त्याची कामगिरी सरस झाली नाही तर त्याचे कसोटी संघातील स्थानही जाऊ शकते.





