IPL 2023 : धोनीलाही रोखणारा संदीप शर्मा बनला हिरो

नवी दिल्ली -बेस्ट फिनिशर महेंद्रसिंह धोनीलाही रोखणारा राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा एका रात्रीत हिरो बनला आहे. अखेरच्या षटकात त्याने अफलातून गोलंदाजी करत आपल्या संघाला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याच्या यॉर्कर चेंडूंमुळे खुद्द धोनीलाही आपल्या संघाला सामना जिंकून देता आला नाही. यामुळे चेन्नई संघाला अवघ्या 3 धावांनी हा सामना गमवावा लागला होता. यानंतर सर्वत्र संदीप शर्माचे कौतुक होत आहे. संदीपने रविवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही भेदक गोलंदाजी केली. त्याच्या 4 षटकांत त्याने केवळ 25 धावा देत त्याने 2 गडी बाद केले. आता त्याच्याकडे डेथ ओव्हर्स बॉलर म्हणून पाहिले जात आहे.
या सामन्यात अखेरच्या चेंडूवर त्याने धोनीला षटकार मारू दिला नाही. संदीप हा मुळातच स्विंग गोलंदाज समजला जातो, तसेच त्याचे यॉर्कर चेंडूही अत्यंत अचूक असतात व तेच त्याने या सामन्यातही सिद्ध केले. तो मुळता पटियाळाचा आहे. संदीप कारकीर्दीच्या प्रारंभी फलंदाज बनण्यासाठी प्रशिक्षण घेत होता. त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाजी करताना पाहिले व गोलंदाजीवरच जास्त लक्ष देण्याचा सल्ला दिला व तोच आज यशस्वी ठरल्याचे दिसले.
2010 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. त्या स्पर्धेत त्याला फारशी संधी मिळाली नसली तरीही त्यानंतर दोनच वर्षात ऑस्ट्रेलियात झालेल्या याच स्पर्धेत त्यानेच भारतीय संघाकडून सर्वात जास्त बळी मिळवले. त्यानंतर त्याला पंजाब किंग्जने आयपीएल स्पर्धेसाठीच्या लिलावात आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते.
संदीपने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताकडूनही खेळण्याची संधी मिळाली. मात्र, या मालिकेत त्याला अपयशाचा सामना करावा लागल्याने त्याचे टी-20 संघातील स्थान गेले होते. त्यानंतर एका सराव सत्रात त्याच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले व त्याला तब्बल पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्यानंतर त्याने देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात मानाच्या रणजी करंडक स्पर्धेद्वारे पुनरागमन केले सर्वाधिक 28 बळी मिळवले. त्याच्या याच कामगिरीने प्रभावीत होत यंदा त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतले व त्यानेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.





