IPL 2023 : दुखापतीमुळे राहुल संपूर्ण आयपीएलमधून बाहेर

लखनौ -भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल याला पायाचे स्नायू दुखावल्यामुळे विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सर्व लढतींतून माघार घ्यावी लागत आहे. लखनौ सुपर जायंट्सला तर या वृत्तामुळे धक्का बसला आहेच, परंतु पुढील महिन्यात 7 ते 11 या कालावधीत इंग्लंडच्या ओव्हलमध्ये होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतही तो खेळणार का नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्ध झालेल्या लढतीत क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या पायाचे स्नायू दुखावले होते व त्याला तातडीने मैदानावरून ड्रेसिंग रुममध्ये घेऊन जाण्यात आले व त्याच्यावर प्राथमिक उपचारही केले गेले. या सामन्यात तो 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, तोपर्यंत लखनौचा पराभव निश्चित झाला होता. सामना संपल्यावर त्याच्या स्कॅनिंगचा अहवाल आला असून, त्याची दुखापत गंभीर असून,
त्याला संपूर्ण विश्रांतीची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अत्याधुनिक उपचार करून घेण्यासाठी राहुल मुंबईला रवाना झाला. आधी श्रेयस अय्यर व आता राहुल यांच्या दुखापतीमुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज होत असलेल्या भारतीय संघाला चांगलाच फटका बसला आहे. अय्यर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असून, आता राहुललाही उपचार व विश्रांतीनंतर तेथेच पाठवले जाणार आहे.





