IPL 2023 : लखनौ एक्स्प्रेस घसरली; नीचांकी धावसंख्येच्या सामन्यात बंगळुरूचा विजय

लखनौ -वादामुळे गालबोट लागलेला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सोमवारी येथे झालेला आयपीएल सामना रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 18 धावांनी जिंकला. बंगळुरूचा विराट कोहली, लखनौचा नवीन उल हक व लखनौचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात सामन्यानंतर घडलेला वाद मात्र संपूर्ण स्पर्धेला गालबोट लावणारा ठरला.
या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डुप्लेसी व विराट कोहली यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, स्थिरावलेला कोहली 30 चेंडूत 3 चौकार फटकावताना 31 धावांवर बाद झाला आणि सामन्याचे चित्र पालटले.
बंगळुरूचे फलंदाज एका पाठोपाठ बाद होत गेले व 1 बाद 62 या स्थितीतून 9 बाद 126 असे कोसळले. डुप्लेसीने 44 धावांची खेळी केली. त्यात 40 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावले. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या 16 धावांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज दोनअंकी धावा करू शकला नाही.
विजयासाठी 127 धावांचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांनीही निराशा केली. कृष्णाप्पा गौतमने 23 धावांची खेळी करताना 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार मारले. त्यानंतर कृणाल पंड्या 13, अमित मिश्रा 19, नवीन उल हक 13 यांनी थोडी चमक दाखवली. मात्र, बंगळुरूच्या जोस हेझलवूड, कर्ण शर्मा यांच्यासह सर्व गोलंदाजांनी अत्यंत मोक्याच्या क्षणी लखनौच्या फलंदाजांना बाद केले व त्यांचा डाव 19.5 षटकांत 108 धावांवर गडगडला व बंगळुरूने 18 धावांनी हा सामना जिंकला.
राहुलला दुखापत
या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना लखनौचा कर्णधार लोकश राहुलला दुखापत झाली. त्याच्या पायाचे स्नायू दुखावल्याने त्याला तातडीने मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. ड्रेसिंग रुममध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तो सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. तो अखेरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला मात्र त्याचवेळी त्यांचा डाव संपुष्टात आला.





