IPL 2023 : जॉस बटलरला राग दाखवणे पडले महागात; बीसीसीआयने ठोठावला दंड

नवी दिल्ली – राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला गुरुवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीसच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जोस बटलर खाते न उघडता धावबाद झाला होता. त्याने यशस्वी जैस्वालसाठी विकेटचे बलिदान देखील दिले होते.
बॅट बाउंड्री दोरीवर आदळली होती म्हणून दंड ठोठावला…
केकेआर विरुद्धच्या सामन्यात, जेव्हा राजस्थान रॉयल्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्यात धावा घेण्यावरून गैरसमज झाला. जोस बटलरने यशस्वी जैस्वालला पहिली धाव घेण्यासाठी बोलावले पण त्यानंतर नकार दिला.
तोपर्यंत यशस्वी खूप पुढे गेला होता आणि या कारणामुळे जोस बटलरलाही धाव घ्यावी लागली पण आंद्रे रसेलने थेट स्टंपला बॉल मारून बटलरला धावबाद केले. याच वेळेस रागाच्या भरात बटलरने त्याची बॅट सीमारेषेवर आदळली याच कारणामुळे बीसीसीआयने बटलरला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे.
दरम्यान, आयपीएल 2023 चा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात असून प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करण्यासाठी सर्वच संघ प्रयत्न करत आहेत त्यामुळे यंदाची आयपीएल ट्रॉफी कोण जिंकतंय हे बघणं महत्वाचे ठरेल.





