… तर आयफोनची किंमत 2 लाख रुपये होणार? ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा Apple ला बसणार फटका

Apple’s iPhones might get Costlier | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर नवीन आयात शुल्क (टॅरिफ) लावल्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन ग्राहकांसाठी वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. प्रमुख टेक कंपनी Apple ला देखील याचा फटका बसू शकतो. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे अमेरिकेत आयफोनची किंमत 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
ट्रम्प यांनी जगभरातील सर्व देशांच्या आयातीवर 10 टक्के आधारभूत शुल्क लावले आहे. तसेच, प्रमुख व्यापारी देशांवर उच्च टॅरिफ लावला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकन ग्राहकांवर मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे. या शुल्क वाढीमुळे आयफोनची किंमत वाढण्याचा अंदाज आहे. रिपोर्टनुसार, जर ॲपलने अतिरिक्त खर्चाचा भार ग्राहकांवर टाकला, तर आयफोनची किंमत सुमारे 2300 डॉलरपर्यंत वाढू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा फटका ॲपलला बसण्याची शक्यता आहे. मॉडेलनुसार, आयफोनच्या किंमतीत 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. आयफोनची निर्मिती चीनमध्ये होते. त्यामुळे ट्रम्प यांनी वाढवलेल्या शुल्काचा थेट परिणाम यावर होणार आहे. ॲपलला हे ठरवावे लागणार आहे की या शुल्काचा भार स्वतः उचलावा की ग्राहकांवर टाकावा.
आयफोन 16 मॉडेलची अमेरिकेत सध्याची किंमत 799 डॉलर (68 हजार रुपये) आहे. जर ॲपलने कराचा भार ग्राहकांवर टाकला तर त्याची किंमत 1,142 डॉलर (97 हजार रुपये) होईल. प्रीमियम मॉडेल आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत 2300 डॉलर (2 लाख रुपये) पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वीही ॲपलला अतिरिक्त कर टाळण्यासाठी विशेष सूट मिळाली आहे.
दरम्यान, तज्ञांनुसार ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या निर्णयामुळे महागाई वाढू शकते, एका सामान्य अमेरिकन कुटुंबाला हजारो डॉलरचा फटका बसू शकतो. तसेच, टॅरिफच्या निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून, गुंतवणूकदारांची प्रचंड नुकसान झाले आहे.





