अमेरिकन ग्राहकांसाठीचे आयफोन तयार होणार भारतात!

iPhone – अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्धाचा भारताला फायदा होण्याची लक्षणे वाढली आहे. अमेरिकन ग्राहकासाठी भारतात तयार होणारे फोन वापरले जाणार असल्याचे अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत अमेरिकेत जाणारे सर्व फोन भारतात तयार झालेले असतील. चीनमध्ये तयार झालेले फोन इतर बाजारपेठासाठी जातील. हळूहळू भारतातील उत्पादन आणखी वाढविण्यात येणार असल्याचे कुक यांनी जानेवारी – मार्च या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
फोनशिवाय इतर उत्पादने ज्यामध्ये आयपॉड, मॅक, अॅप्पल वॉच, एअरपॉड इत्यादी उत्पादनाचा समावेश आहे, ती उत्पादने व्हिएतनांमध्ये तयार करण्यात येणार आहेत. प्राप्त माहितीनुसार अमेरिकेत 2024 मध्ये 75.9 दशलक्ष आयफोन विकले गेले. त्यातील 3.1 दशलक्ष फोन केवळ मार्च महिन्यात भारतातून अमेरिकेत पाठविले गेले. यामुळे आगामी काळात भारतातून फोन पाठविण्याची प्रक्रिया अधिक वेग घेणार आहे.
चीनमधून अमेरिकेला होणार्या निर्यातीवर 145 टक्के आयात शुल्क लागते. त्यामुळे अमेरिकेत ही उत्पादने महाग पडतात. अशा परिस्थितीत आम्हाला चीनशिवाय इतर देशातून ही उत्पादने आयात करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अॅपल कंपन्यांच्या विविध उत्पादनाला अमेरिकेत आयात करण्यासाठी 900 दशलक्ष डॉलरचे आयात शुल्क द्यावे लागणार असल्याचे कुक यांनी सांगितले.
भारतामध्ये आयफोनचे उत्पादन दोन प्रकल्पातून चालते. या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करत आहे. या कामी भारत सरकार आणि संबंधित राज्य अॅपल कंपनीला पूर्ण सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.





