आखातामधील पेचप्रसंगामुळे गुंतवणूकदारांकडून विक्री; निर्देशांकात अर्धा टक्के घट

मुंबई : अमेरिकेने अचानक शनिवारी इराण मधील तीन अनु संशोधन केंद्रावर हल्ले केल्यामुळे जगातील विविध बाजारात अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. खनिज तेलाच्या पुरवठयाबाबत शंका व्यक्त होत आहेत. मात्र ही अशी परिस्थिती फार काळ टिकणार नाही असे बर्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. परिणामी सोमवारी शेअर बाजार निर्देशांकात माफक घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 511 अंकानी म्हणजे 0.62 टक्क्यांनी कमी होऊन 81,896 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 140 अंकांनी म्हणजे 0.56 टक्क्यांनी कमी होऊन 24,971 अंकावर बंद झाला. आज माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्याचबरोबर तेल कंपन्यांच्या शेअरवरही दबाव होता. मात्र भांडवली वस्तू, धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांक जास्त घसरले नाहीत.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात आखातात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली होती. मात्र अमेरिकेने अचानक हल्ले केल्यानंतर सर्व समीकरणे पुन्हा बिघडली आहेत. खनिज तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे गुंतवणूकदार एक तर सावध आहेत किंवा नफा काढून घेत आहेत.
जागतिक बाजारात सोमवारी बरेच नकारात्मक वातावरण होते. दक्षिण कोरिया, जपानमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. तर चीन आणि हाँगकाँग मधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. युरोपमधून आलेल्या माहितीनुसार शेअर बाजार निर्देशांक पिछाडीवर होते. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. समाधानाची बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार कमी प्रमाणात का होईना भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 7,940 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र परिस्थिती जास्तच बिघडली तर हे गुंतवणूकदार सावध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





