आयटीआय बळकटीकरणासाठी १२० कोटींची गुंतवणूक; तरुणांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण – वैभव सोलणकर

बारामती – महाराष्ट्राला कौशल्यविकासाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुंबई, पुणे, बारामती, नाशिक, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील निवडक सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) आधुनिकीकरण करण्यासाठी १२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे दरवर्षी ५ ते ७ हजार विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळणार असून, त्यांना देश-विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती माळेगाव येथील अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापन परिषद सदस्य वैभव सोलणकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या कौशल्यविकास आणि बंदरे विभागाने विदेशी संस्था अटल सोल्युशन्स इंटरनॅशनल यांच्यासोबत विधान भवनात सामंजस्य करार केला आहे. या कराराद्वारे बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. या कराराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री नितेश राणे, अटल सोल्युशन्स इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक एडविन सिएसवर्दा, रुरल एनहान्सर ग्रुपचे अंबर आयदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव, वाढवण बंदर विकास कंपनी लिमिटेडचे संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या करारामुळे आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण होऊन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण मिळेल. यातून तरुणांना बंदर, लॉजिस्टिक आणि संबंधित क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खासगी आणि सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून हा उपक्रम महाराष्ट्राला कौशल्यविकास क्षेत्रात अग्रेसर ठरेल, असे सोलणकर यांनी सांगितले.
“सरकारच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. आयटीआय विद्यार्थ्यांना आतापर्यंत असे जागतिक व्यासपीठ मिळाले नव्हते. राज्य सरकारच्या या प्रयत्नांमुळे तरुणांचे भविष्य उज्ज्वल होईल,” असे वैभव सोलणकर, शासन नियुक्त सदस्य, अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव यांनी नमूद केले.





