आयटीआयचे निदेशक आता तात्पुरत्या कंत्राटी नोकरीवर

पुणे – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने मान्यता देण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षीत व अनुभवी निदेशक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वेळोवेळी भरतीची कार्यवाही करण्यात येते. तथापि, तातडीच्या प्रसंगी व भरतीच्या कार्यवाहीस लागणाऱ्या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षणाचे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून प्रशिक्षणाकरीता तासिका तत्वावर तासिका निदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे निदेशक कंत्राटी पद्धतीने नियुक्तीची मागणी वारंवार करीत आहेत, या मागणीकरीता त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन केले होते.





