16 लाख कोटींची गुंतवणूक अन् 16 लाख रोजगार…; दावोसमध्ये महाराष्ट्राचा गुंतवणूकीत विक्रम

दावोस – स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने दोन दिवसांत 16 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एकूण ६१ सामंजस्य करार केले आहेत. यातून १६ लाख रोजगारनिर्मिती होईल, असा दावा केला जात आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकाप परिषद घेत माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रात एमओयू झाले आहेत. विदर्भात 5 लाख कोटी गुंतवणुकीचे करार, उत्तर महाराष्ट्रात 30 ते 35 हजार कोटींचे गुंतवणूक करार, मराठवाड्यातही चांगले एमओयू झाले आहेत. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मराठवाडा नवीन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे.
LIVE | Press Conference from #Davos@wef#WEF25 #MahaAtDavos #MahaNo1AtDavos https://t.co/AVHsl27tVe
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2025
गडचिरोलीत आपल्याला 98 टक्के गुंतवणूक थेट एफडीआयच्या माध्यमातून होत आहे. परदेशी गुंतवणुकीमुळे राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी सुरुवात केली होती, तसेच मागच्या वेळी जे करार झाले त्यातील अनेक करार मार्गी लावू शकलो आहोत. इतर राज्यांच्या कराराच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा आनंद आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
दावोस हे जागतिक नेटवर्किंगचे केंद्र आहे. जगभरातील सीईओ वर्ल्ड इकोनॉमी फोरमनिमित्त याठिकाणी येत असतात. ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत आपण करार केले आहेत, त्यांची इच्छा असते त्यांचे जे फॉरेन पार्टनर आहेत ते आपल्या करारावेळी उपस्थित असले पाहिजेत, त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली पाहिजे.
त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळेजण दावोसला एकत्र येतात. त्यामुळे सर्व करार दावोसमध्ये होतात. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपण आपली ताकद दाखवतो. नेटवर्किंक फोरममधून सगळे एकमेकांना भेटतात. गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळे दावोस हे केंद्र म्हणून पुढे येत आहे. भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते त्याचे द्योतक हे करार आहेत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.





