घरफोडीच्या तपासात आंतरराज्यीय गुन्हेगारांस अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा – येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा शहर पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक करत त्यांच्याकडून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर झोपडपट्टी, चिंचवड गाव), धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी), दीपक शिवाजी मेंदगे (३८, रा. पाटील आळी, कर्जत) आणि कैलासचंद्र धगनलाल जाट (४०, रा. वाशी) अशी अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय सराईतांची नावे आहेत. यातील चंद्रकांत उर्फ चंदू माने याच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोणावळा पोलीस ठाण्यात ९ जून रोजी बिना नारायण मुळे (६५, रा. जुना खंडाळा रोड, लोणावळा) यांनी त्या घरात नसताना चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. चोरांनी त्यांच्या घरातून २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी याबाबत तपासाला सुरूवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत या गुन्ह्यातील आरोपी हे लोणावळा स्टेशनकडे जाऊन रेल्वेने पिंपरी-चिंचवड येथे गेल्याचे स्पष्ट झाले.
गोपनीय बातमीदारांमार्फत फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपींपैकी चंदू माने हा चाफेकरनगर, झोपडपट्टी येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी चंदू माने आणि धनंजय काळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दीपक मेंदगे आणि कैलासचंद्र जाट यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना उर्वरित दोघांना ताब्यात घेत अटक केली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. राजेश रामाघरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.





