पोस्ट ऑफिसची इंटरनेट सेवा अखेर सुरू

पुणे – शहरातील मध्यवर्ती भागातील सिटी पोस्टाच्या कार्यालयासह 20 सलग्न कार्यालयात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. ही सेवा बुधवारी सकाळी अखेर पूर्ववत झाली आहे. पोस्ट विभाग आणि बीएसएनएलमधील समन्वयाअभावी नेटवर्क बंद पडल्याने पोस्ट कार्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या पेन्शनधारकांना हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) घेण्यासाठी येणाऱ्या पेन्शनधारकांना याचा सर्वाधिक फटका बसत होता.
या पेन्शनधारकांना नेटवर्क नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून पोस्टात हेलपाटे घालावे लागत असल्याची व्यथा दैनिक प्रभातने “पेन्शनच्या कामाला नेटवर्कचा खोडा’ या वृत्ताद्वारे समोर मांडली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणेकडून बुधवारी दिवसभरात कार्यालयात बंद असलेली इंटरनेटची सेवा पूर्ववत करण्यात आली.
शहरातील मध्यवर्ती भागातील सिटी पोस्टाच्या कार्यालयासह 20 सलग्न कार्यालयात इंटरनेट सेवा गेल्या आठ दिवसांपासून बंद होती.
नोव्हेंबर महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना “जीवन प्रमाणपत्र’ देणे आवश्यक असते आणि त्याची सोय पुणे सिटी पोस्ट खात्यात सुरू केली आहे; पण आता या प्रक्रियेला आठ दिवस होत आले तरी अजूनही प्रक्रिया सुरळीत झालेली नाही.
शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पेन्शनधारक राहत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक या पोस्ट कार्यालयास प्राधान्य देतात. मात्र, या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद असणे, नेटवर्क न मिळणे, नेटवर्कसह कॉम्पुटर हॅंग होणे, ज्यांच्या अंगठ्याचे ठसे येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी “आय स्कॅन’ केले जाते; पण त्यासाठी यंत्रणा अजूनही उपलब्ध नाही.
केवळ हाताच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत. मात्र, ज्यांचे ठसे मिळत नाहीत, त्यांना “जीवन प्रमाणपत्रांसाठी पुन्हा बोलावले जात असल्याने पेन्शनधारकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यावरून अनेकदा पोस्टाचे कर्मचारी आणि नागरिकांमधे मोठया प्रमाणात वादही होत असल्याचे पहायला मिळाले.
” सिटी पोस्टासह, शहरातील वेगवेगळ्या 20 कार्यालयात नेटवर्कची समस्या होती. याबाबत सातत्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांच्या संपर्क सुरू होता. तसेच याबाबतची तक्रार वरिष्ठ पातळीवरही करण्यात आली होती. बुधवारी सकाळी सिटी पोस्टासह 13 कार्यालयांची नेटवर्क सुरू झाले तर सायंकाळी उर्वरित कार्यालयांचे नेटवर्क पूर्ववत झाले आहेत.”- एस. आर. साबळे, सहायक अधीक्षक, पुणे शहर (पश्चिम विभाग)





