आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे – शहरातील शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध प्रात्यक्षिके सादर केली. शहरातील बहुसंख्य शाळा, महाविद्यालयात योग दिन समारंभाला प्रतिसादही चांगला मिळाला आहे. पुणे शहर भाजप, आर्ट ऑफ लिव्हिंग, महाएनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर योगासनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यात पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नारायण पेठेतील पुणे महापालिकेच्या कै. वा. ब. गोगटे शाळेत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
योग दिनाबाबत जागृती
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने योगा आणि प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले. प्रमुख अतिथी भारतीय योग संस्थानचे योग प्रशिक्षक प्रधान सोहन मंत्री यांनी विविध योगासनांचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. व्ही. एन. शिंदे, एनएसएसच्या जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, शा. शि. संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ, प्रा. सचिनकुमार शहा, डॉ. धीरज देशमुख, प्रा. सागर बराटे उपस्थित होते. डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. धीरज देशमुख यांनी मानले.
दोन हजार विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. “आझम स्पोर्टस अकादमी’चे संचालक डॉ. गुलझार शेख, शबनम पिरजादे, माजिद सय्यद यांनी संयोजन केले.
“जी-20′ प्रतिनिधींचा योग दिनात सहभाग
“जी-20′ अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित अंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांसह परदेशी पाहुण्यांनी योगवर्गात सहभाग घेतला. कुलगुरू प्रा.गोसावी यांनी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केले. योगगुरू डॉ.संप्रसाद विनोद आणि डॉ.विश्वनाथ पिसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. परदेशी प्रतिनिधींनी ही प्रात्यक्षिके आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेण्यासोबत योगशास्त्राची माहिती अत्यंत लक्षपूर्वक जाणून घेतली.
अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके
सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिर आवारात शताब्दी वर्षात पदार्पण केलेल्या श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टतर्फे आबासाहेब अत्रे प्रशालेत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील योगपटू विठ्ठल कडू व त्यांची मुले सिद्धेश व नारायणी कडू यांनी क्लिष्ट योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
गौरव सोनवणे, ऋषिकेश सोनवणे, सचिन लांडगे, प्रकाश लांडगे, सचिन पवार, सोहम हंबीर, हर्षद बर्लाल हे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पियुष शहा यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे कार्यकर्ते सचिन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. योगपटूंचा सत्कार विश्वासराव सोनवणे यांनी केला. अत्रे प्रशालेतील ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावी
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी मार्गदर्शन केले. भाग्यश्री हजारे यांनी योगदिनाची माहिती सांगितली. रुपाली सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा कदम, मीनल कचरे यांनी योगगीत सादर केले. योगिता भावकर यांनी आभार मानले.
तनुजा तिकोने, धनंजय तळपे, सुषमा घडशी यांनी आयोजन केले होते. टिळक रोडवरील डेक्कन एजुकेशन सोसायटीची पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत लीना सुमंत यांनी मुलांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले.
प्रियांका शेंडकर व अमृता महाबळेश्वरकर यांनी मुलांकडून आसने करून घेतली. ऐश्वर्या जोशी यांनी वाद्यांची माहिती दिली. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या मार्गदर्शखाली नियोजन केले.
शिवाजीनगर येथील पी.ई.एस. मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या प्रांजली हळदणकर होत्या. माया नाईक यांनी योगाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौ. वैशाली घोडके बाईंनी केली. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, शाला समिती अध्यक्षा पल्लवी जाधव, शाला समिती व्हिजिटर उद्धव खरे, संस्थेच्या नियामक समितीच्या सदस्या मोनिका वैद्य यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.





