Winter Olympics : आयओसीनं घेतला मोठा निर्णय, ‘या’ दोन शहरांना 2030 आणि 2034 च्या हिवाळी ऑलिम्पिकचे दिलं यजमानपद…

Winter Games International Olympic Committee :– आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बुधवारी 2030 हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान फ्रान्सच्या फ्रेंच आल्प्स आणि 2034 चे यजमानपद अमेरिकेच्या सॉल्ट लेक सिटीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
काही अटींच्या आधारे यजमानपद फ्रान्सकडे सोपवण्यात आले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयओसीला आश्वासन दिले की, उन्हाळी ऑलिम्पिक खेळ 2024 पूर्ण झाल्यानंतर जे सरकार स्थापन होईल ते या स्पर्धेशी संबंधित सर्व अटी पूर्ण करेल. यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. फ्रान्समध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जो कोणी पंतप्रधान होईल त्याला या अटींवर स्वाक्षरी करावी लागणार आहे. यासाठी आयओसीने ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली आहे.
आयओसी सदस्यांनी त्यांचे आश्वासन स्वीकारले असून यजमानपदाचे अधिकार फ्रान्सला देण्याच्या बाजूने मतदान केले आहे. फ्रान्सच्या यजमानपदाच्या बाजूने 84 सदस्यांनी मतदान केले तर चार सदस्यांनी विरोधात मतदान केले. सात सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
यावेळी बोलताना मॅक्रॉन म्हणाले, “आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पूर्ण सन्मान करू.” या खेळांचे आयोजन करण्यासाठी बोली लावणारा फ्रान्स हा एकमेव देश होता. फ्रान्सने यापूर्वी 1924, 1968 आणि 1992 मध्ये तीन वेळा हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन केले आहे.
32 वर्षांनंतर उटाह यजमान….
आयओसी सदस्यांनी नंतर 2034 हिवाळी खेळ आयोजित करण्यासाठी उटाहची राजधानी सॉल्ट लेक सिटीच्या नावावर शिक्कामोर्तबही केले. सॉल्ट लेक सिटी 32 वर्षांनंतर या खेळांचे आयोजन करणार आहे. यापूर्वी 2002 मध्ये पहिल्यांदा हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. सॉल्ट लेक सिटीच्या वतीने बोली लावणाऱ्यांमध्ये उटाहचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स, सॉल्ट लेक सिटीचे महापौर एरिन मेंडेनहॉल आणि अल्पाइन स्की दिग्गज लिंडसे वॉन यांचा समावेश होता.





