Balochistan terrorist : बलुचिस्तानमध्ये आठवड्याभरात १०५ दहशतवादी ठार !
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका आठवड्यात १०५ हून अधिक दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी ७१ जण ७ जुलै रोजी ऑपरेशन शाबान सुरू झाल्यापासून मारले गेले आहेत.

Balochistan terrorist : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका आठवड्यात १०५ हून अधिक दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी ७१ जण ७ जुलै रोजी ऑपरेशन शाबान सुरू झाल्यापासून मारले गेले आहेत, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
बलुचिस्तानमध्ये अलिकडील काही महिन्यांमध्ये वांशिक बलुच बंडखोर आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडून होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाली आहे. दिनांक ५ जुलैपासून १०९ दहशतवादी ठार झाले आहेत.
त्यामध्ये पाकिस्तान लष्कर, फ्रंटियर कॉर्प्स आणि बलुचिस्तान पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन शाबान’मध्ये ठार झालेल्या ७१ जणांचा समावेश आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ही कारवाई क्वेटा जिल्ह्यातील शाबान भागातील दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी सुरू केली गेली.
तिथे ५ जुलै रोजी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा आणि आसपासच्या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांगी धरणाच्या पंपिंग स्टेशनवरील पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात २७ पोलीस अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर, ऑपरेशन शाबान या सांकेतिक नावाने ७ जुलै रोजी सुरक्षा रक्षकांची मोहिम सुरू करण्यात आली.





