पणजी – जपानमधील युद्धाच्या पार्श्वभुमीवरील दिग्दर्शक मासाकाझू कानेको यांच्या “रिंग वॉन्डरींग’ या चित्रपटाची यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सूवर्ण मयूर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युद्धग्रस्त काळानंतर विस्मृतीत गेलेल्या भूतकाळात दडलेल्या हजारो आत्म्यांना समर्पित असा हा चित्रपट आहे.
पणजी इथे गेले नऊ दिवस चाललेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीची आज रंगतदार आणि दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित या महोत्सवाच्या विविध स्पर्धा विभागाचे ज्युरी आणि भारतीय तसेच परदेशी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021” हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
झेक दिग्दर्शक वाक्लॅव काद्रंका यांचा “सेव्हिंग वन हू इज डेड’ हा चित्रपट यंदाच्या इफ्फीमध्ये रजत मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केलेली धडपड अनेक अडथळे पार करीत यशस्वी होते. एका संधीप्रकाशात अडकलेल्या आईची आणि तिच्या मुलाची ही कथा जीवन आणि मृत्यूच्या कल्पनांना जोडणारी आहे.
1980 च्या दशकात ब्राझीलमध्ये लैंगिक अल्पसंख्याकांनी भोगलेल्या दुःख आणि भेदभावाच्या आतापर्यंत समोर न आलेल्या कथा मांडणाऱ्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटातील ब्राझिलियन अभिनेत्री आणि सहाय्यक दिग्दर्शिकेला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 1984 च्या सोविएट रशियाच्या गुंतागुंतीच्या आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार “द डॉर्मला’ प्रदान करण्यात आला.
“इफ्फी’तील पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार अजेंटिनाच्या “जहोरी’ या चित्रपटाला मिळाला. जहोरी हे घोड्याचे नाव असून जंगलात जाण्याची आणि मुक्त होण्याची इच्छा आहे. याशिवाय पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून चिलीतील “वेल्थ ऑफ द वर्ल्ड’चा गौरव करण्यात आला.
जीतेंद्र जोशी सर्वोत्कृष्ठ अभिनेता
मराठी चित्रपट अभिनेते जीतेंद्र भिकूलाल जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरूष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जीतेंद्र जोशी यांना “गोदावरी’ चित्रपटामध्ये दिवंगत मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सूवर्ण मयूर, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख यावेळी देण्यात आले.
रेनाटा कोर्व्हालो यांना सुवर्ण मयूर
त्याबरोबरच निखील महाजन यांचा मराठी चित्रपट “गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या “द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. निखील महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट एका माणसाची त्याच्या गोदावरीशी असलेल्या नात्याने दिलेली प्रेरणा आणि प्रोत्साहन यातून पुरातन परंपरा आणि संस्कृती जपण्याची तात्विक आस दर्शवितो.