जागतिक दिव्यांग दिन: हक्क, सन्मान आणि समानतेचा उत्सव

स्वप्निल काळे
पिंपरी – दरवर्षी ३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९९२ पासून या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. समाजातील सर्व दिव्यांग व्यक्तींना समान हक्क, संधी आणि सन्मान मिळावा, तसेच त्यांच्या समस्यांविषयी जागरूकता वाढावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जागतिक आरोग्य आणि आर्थिक असमानता यांचा सर्वाधिक फटका या घटकांना मोठ्या प्रमाणात बसतो. दिव्यांग व्यक्तींना शिक्षणातील समान संधी, रोजगाराची उपलब्धता, आरोग्यसेवा, तसेच सामाजिक स्वीकार मिळावा, यासाठी या दिवशी विशेष उपक्रम आयोजित केले जातात.
अनेक दिव्यांग व्यक्तींना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या असुविधा, भेदभाव, प्रवासातील अडथळे आणि तांत्रिक साधनांच्या अभावामुळे त्यांच्या क्षमतेनुसार योगदान देऊ शकत नाहीत. या दिवसाच्या निमित्ताने समाजाला हे समजावून सांगितले जाते की, दिव्यांगता ही मर्यादा नसून वेगळी क्षमता आहे.
१९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून प्रत्येक वर्षी ३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस पाळण्याचा निर्णय घेतला. दिव्यांगांच्या हक्कांबद्दल जनजागृती निर्माण करणे, समाजात त्यांना आदर आणि समतेचे स्थान मिळवून देणे, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर त्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमतांच्या आधारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
जागतिक दिव्यांग दिन, हा केवळ एक दिवस नसून समाजाच्या दृष्टीकोनात बदल घडवण्याची एक प्रक्रिया आहे. दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात.
भारतामधील प्रेरणादायी व्यक्तिमत्व
डॉ. सत्येंद्र सिंह लोहिया – जलतरणवीर
त्यांना ७० टक्के दिव्यांगत्व असूनही त्यांनी १२ तासात इंग्लिश चॅनल पार केली आहे. ओपन वॉटर स्विमिंग मधील त्यांची कामगिरी जागतिक पातळीवर गौरवली जाते.
गिरिश शर्मा – पॅराअॅथलीट
गिरिश शर्मा यांना एक पाय नसतानाही त्यांनी बॅडमिंटनमध्ये देशासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.
पद्मश्री सुधा चंद्रन – नृत्यांगना
त्यांनी अपघातात पाय गमावला, पण कृत्रिम पायाच्या सहाय्याने नृत्यकौशल्य टिकवून ठेवत त्या देशातील अग्रगण्य नृत्यांगना बनल्या.
अरुणिमा सिन्हा – गिर्यारोहक
रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यावरही त्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग महिला असा इतिहास त्यांनी रचला.
राज्यातील पहिले दिव्यांग भवन
पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले दिव्यांग भवन मोरवाडी, पिंपरी येथे उभारले आहे. या दिव्यांग भवनात दिव्यांगासाठी सर्व 21 प्रकारच्या आवश्यक थेरपी अत्याधुनिक उपकरणांसह उपलब्ध आहेत. दिव्यांग भवन फाऊंडेशन च्या इमारतीची रचना ही दिव्यांगांसाठी अडथळा विरहित व सुलभ करण्यात आलेली आहे.
दिव्यांगांच्या विकासासाठी मार्गदर्शन पर, प्रेरणादायी आणि विकासात्मक जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत. दिव्यांगांसाठी आवश्यक आणि आद्ययावत उपकरणांची माहिती देण्यात येते. दिव्यांगांसाठी सुलभ व प्रगत डिजिटल लायब्ररी सुविधा देण्यात आली आहे.
तसेच दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकसित करण्यात येत आहे. अलिकडेच दिव्यांगासाठी खास रोजगार मेळावा घेण्यात आला होता. यात बड्या कंपन्यांनी सहभाग घेत दिव्यांगाना नोकरी देखील देण्यात आली.





