नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ (IFSO) विभागाने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर सिंडिकेटचा छडा लावत १०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या टोळीचे जाळे चीन, नेपाळ, कंबोडिया, तैवान आणि पाकिस्तानपर्यंत पसरलेले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका तैवानी नागरिकासह सात जणांना अटक केली आहे. हे आरोपी ‘सिम बॉक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशातून येणारे कॉल भारतीय क्रमांकावरून येत असल्याचे भासवत असत आणि ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून लोकांची लूट करत असत. आतापर्यंत या टोळीशी संबंधित २० हजार फोन नंबर आणि १,००० हून अधिक तक्रारी समोर आल्या आहेत. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी पीडित व्यक्तींना दिल्ली किंवा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा खोटा आरोप करून घाबरवत असत. तात्काळ अटकेची भीती दाखवून आणि मानसिक दबाव निर्माण करून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात असे. पोलिसांनी या कारवाईत २२ सिम बॉक्स, ८ मोबाईल फोन, ३ लॅपटॉप, ५ राउटर, १२० चिनी सिम कार्ड आणि इतर तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. आरोपींनी त्यांची ओळख लपवण्यासाठी आणि लोकेशन ट्रॅक होऊ नये यासाठी कॉल २जी नेटवर्कवरून वळवण्याची शक्कल लढवली होती. या कटाचा मास्टरमाइंड तैवानी नागरिक आय-त्सुंग चेन असल्याचे समोर आले आहे, जो सिम बॉक्स उपकरणांचा पुरवठा आणि तांत्रिक मांडणी पाहत असे. पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावरून शिताफीने अटक केली. चौकशीत असे निष्पन्न झाले की, पंजाबमधील मोहाली येथेही त्यांनी अशाच प्रकारचे केंद्र उभारले होते. तेथून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी कबुली दिली की, कंबोडियात त्यांना एका पाकिस्तानी हँडलरने भरती करून प्रशिक्षित केले होते. त्यानंतर त्यांनी भारतात परतून हे बेकायदेशीर सिम बॉक्स हब सुरू केले. या टोळीचे जाळे केवळ दिल्ली किंवा पंजाबपुरते मर्यादित नसून ते कोईमतूर आणि मुंबईपर्यंत पसरले होते. मुंबईच्या मालाड परिसरातूनही एका सिव्हिल इंजिनीअरला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे सर्वात धक्कादायक वास्तव म्हणजे या सिंडिकेटचे मुख्य ‘कमांड सेंटर’ नेपाळमधून चालवले जात होते. कंबोडियात गुन्हेगारांना प्रशिक्षण दिले जात असे, तर चिनी नागरिकांकडून तांत्रिक हार्डवेअरचा पुरवठा केला जात होता. पाकिस्तानी हँडलर याला आर्थिक रसद आणि ओळख लपवण्याचे तंत्र पुरवत होते. भारतीय तपास यंत्रणांच्या कक्षेबाहेर राहून हे नेटवर्क चालवण्यासाठी नेपाळचा वापर मुख्य केंद्र म्हणून केला जात होता.