Shashi Tharoor | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. यादरम्यान शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या स्वागतार्थ डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या डिनरला विरोधी पक्षातून काँग्रेस नेते शशी थरूर यांनाच निमंत्रण देण्यात आले होते आणि ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. पण त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मात्र आमंत्रणच पाठवले नाही. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. थरूर आपल्या पक्षातील नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. पवन खेरा काय म्हणाले? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी केंद्र सरकारवर पुतिन यांच्या दौऱ्यात सर्व प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. पवन खेरा यांनी म्हटलं की, “मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी विरोधी पक्षातील दोन नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, हे आश्चर्यकारक आहे. परंतु आपल्याला आश्चर्य वाटू नये कारण या सरकारला सर्व प्रोटोकॉल तोडण्याची सवय आहे. मात्र शशी थरूर यांनी आमंत्रण स्वीकारलं हे खूपच आश्चर्यकारक आहे,” असं खेरा यांनी म्हटलं आहे. पुढे पवन खेरा यांनी म्हटलं की, “शशी थरूर यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा खेळ का खेळला जातोय. आमंत्रण पाठवलं आणि स्वीकारलंही हे खूपच आश्चर्यकारक आहे. प्रत्येकाला सदसद्विवेकबुद्धी असते. जेव्हा माझ्या नेत्यांना बोलावण्यात आलं नव्हतं, पण मला बोलावण्यात आलं, तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा खेळ का खेळला जात आहे.” Shashi Tharoor | राहुल गांधींकडून नाराजी व्यक्त तर ४ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर परदेशी मान्यवरांना विरोधी पक्षनेत्याला भेटण्याची परवानगी देण्याची परंपरा मोडल्याचा आरोप केला होता. मात्र सरकारने हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. दरम्यान,शशी थरूर यांना आपल्या पक्षातील सदस्यांकडून टीका होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरवर परदेशात भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करण्याबाबतही त्यांच्यावर टीका झाली होती. गेल्या काही दिवसांमध्ये शशी थरूर यांनी आपल्याच पक्षाच्या चुकांवर भाष्य करत आहे. त्यामुळे शशी थरूर यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. Shashi Tharoor | हेही वाचा : पुणे-मुंबई दरम्यान उद्या मेगाब्लॉक! विविध एक्सप्रेस रद्द; पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या बंद राहणार जाणून घ्या…